सभापती रवींद्र जठार; जिल्हा परिषद बांधकाम समिती सभेत सूचना…
सिंधुदुर्गनगरी,ता.०६: जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचा प्रश्न गंभीर असून शाळा दुरुस्तीची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करा. ज्या शाळांच्या कामांना कार्यारंभ आदेश झालेले नाहीत अशा कामांची आवश्यक पूर्तता करून तत्काळ कार्यारंभ आदेश द्या असे आदेश सभापती रवींद्र जठार यांनी बांधकाम समिती सभेत दिले.
जिल्हा परिषद बांधकाम समिती सभा सभापती रवींद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी येथील ब्यारिस्टर नाथ पै सभागृहात संपन्न झाली.यावेळी समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, सदस्य प्रदीप नारकर, जेरोन फर्नांडीस, रेश्मा सावंत, श्रीया सावंत, राजेश कविटकर, राजन मुळीक, मनस्वी घारे, संजय आग्रे या सर्व अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची कामे अद्यापही राखलेली आहेत. ही कामे केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला असता, आतापर्यंत 167 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. लवकरच ही कामे सुरू होतील अशी माहिती सभेत देण्यात आली. जिल्ह्यात नादुरुस्त शाळांचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यापूर्वी शाळांची दुरुस्ती न झाल्यास मुलांना कुठे बसवणार याचा विचार करून ज्या शाळांच्या कामांना कार्यारंभ आदेश दिले नाही अशा कामांची आवश्यक ती पूर्तता करून घेऊन तात्काळ कार्यारंभ आदेश द्या तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व त्यांची दुरुस्ती करून घ्या असे आदेश रवींद्र जठार यांनी सभेत दिले.



