शिक्षणाचा फायदा समाजाच्या विकासासाठी करा…

2

अनिल सर्वदे ; भंडारी हायस्कूलच्या शलाका वार्षिकांकाचे प्रकाशन…

मालवण, ता. ६ : एखादी गोष्ट आत्मविश्वासाने केल्यास त्यात कोणीही अडथळा आणू शकत नाही. विद्यार्थ्यांनी श्रीमंत होण्यासाठी शिक्षण न घेता घेतलेल्या शिक्षणाचा फायदा आपल्याबरोबरच समाजाच्या विकासासाठी कसा होईल. जेणेकरून समाज कसा सुखी, समृद्ध होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत असे प्रतिपादन हाईजैनिक रिसर्च इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड अंधेरी मुंबईचे व्यवस्थापक अनिल सर्वदे यांनी येथे केले.
येथील भंडारी हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाच्या शलाका या वार्षिकांकाचे प्रकाशन श्री. सर्वदे, वृषाली वडकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापिका सुप्रिया टिकम, पर्यवेक्षक व्ही. जी. खोत, शांतादुर्गा हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील, प्रा. रूपेश बांदेकर, प्रफुल्ल देसाई, दशरथ कवटकर, लीलाधर चव्हाण, रवींद्र वराडकर, प्रा. सुनंदा वराडकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ. टिकम यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रफुल्ल देसाई यांनी करून दिला.
श्री. सर्वदे म्हणाले, भंडारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगले शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चांगले भवितव्य घडण्यास मदत होईल. जगात अशक्य असे काही नाही. आत्मविश्‍वासाने एखादी गोष्ट केल्यास त्यात कोणीही अडथळा आणू शकत नाही. श्रीमंत होण्यासाठी शिक्षण घेऊ नका. जीवनात सुखी होण्यासाठी शिक्षण घ्या. श्रीमती वडकर म्हणाल्या, भंडारी हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रगतीचा आलेख हा चढता राहिलेला आहे. हायस्कूलमधील आयबीटी हा विभाग मुंबईतील शाळांमध्येही दिसत नाही. येथील विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणार्‍या तंत्रज्ञानाच्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. या प्रशालेच्या मुलांचे भाग्य आहे.
श्री. हेरेकर म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांमधील साहित्य विषयक गुणांना वाव देण्यासाठी भंडारी हायस्कूल दरवर्षी शलाका वार्षिकांक प्रकाशीत करत आहे. यासाठी संपादक मंडळाने मोठी मेहनत घेतली असून या वार्षिकांकासाठी माजी विद्यार्थी भगवंत नाईकसाटम यांच्याबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक, माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आहे. यावेळी श्रीमती वृषाली वडकर, अनिल सर्वदे यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. वराडकर यांनी आभार मानले.

1

4