काही काळी वाहतूक विस्कळीत ः आंदोलकांची ताब्यात घेऊन सुटका
कुडाळ, ता. 8 ः सोनवडे-घोटगे घाटमार्गाचा प्रश्न 40 वर्षे प्रलंबित आहे. निवेदने, आंदोलने करूनही या घाटमार्गाचे काम मार्गी लागत नसल्याने सोनवडे-घोटगे घाटमार्ग संघर्ष समितीने आज पणदूर येथे रास्ता रोको केला. सुमारे एक तास आंदोलन सुरू होते. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. दरम्यान सोनवडे घाटमार्गाचे काम सुरू होईपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहणार असल्याची माहिती घाटमार्ग संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.महेंद्र नाटेकर यांनी दिली.
सोनवडे घोटगे घाटमार्गाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रा.महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली जांभवडे, घोटगे, सोनवडे, कुपवडे आदी भागातील घाटमार्ग संघर्ष समितीच्या कार्यकर्ते आज पणदूर तिठा येथे एकत्र आले होते. तर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी महामार्गावर पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. घाटमार्ग संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी महामार्गालगत एक तास आंदोलन केले. त्यानंतर रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या दरम्यान महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.