वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणाऱ्या युवकांकडून महिलेस-दिरास मारहाण…

2

वायरी-तानाजी नाका येथील घटना ; संशयित युवकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल…

मालवण, ता. १० : धिंगाणा घालत वाढदिवस साजरा करणाऱ्या युवकांच्या टोळक्याने वायरी तानाजी नाका येथील एका महिलेस व तिच्या दिरास मारहाण केल्याची घटना मध्यरात्री घडली. या घटनेमुळे संबंधित महिलेच्या कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. या प्रकरणी संशयित युवकांविरोधात संबंधित महिलेने तक्रार दिली आहे.
वायरी तानाजी नाका परिसरात मध्यरात्री काही युवकांचे टोळके वाढदिवस साजरा करत होते. त्यांच्याकडून धिंगाणा सुरू असल्याने तेथील एका महिलेने घराबाहेर येत धिंगाणा का घालत आहात असे विचारले. यावेळी तेथे आलेल्या त्या महिलेच्या दिरास युवकांच्या टोळक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला सोडविण्यास गेलेल्या महिलेलाही त्यांनी मारहाण केली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे त्या महिलेच्या कुटुंबियांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी त्या संशयित युवकांच्या विरोधात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शहरात रात्रीच्या वेळेस वाढदिवस साजरा करण्याचा बहाण्याने युवकांच्या टोळक्यांकडून धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा युवकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

9

4