पालकमंत्र्यांची उदय सामंत यांची ग्वाही : आयसीयू युनिटही लवकरच सुरू करणार…
कणकवली, ता.१०: कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील किडनी डासलेलीस यंत्रणेचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून हे युनिट उपलब्ध करून देण्यात आले. याठिकाणी अवघ्या दीडशे रुपयांत रुग्णांना डायलिसिस सेवा दिली जाणार आहे. याखेरीज उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयू युनिट देखील सुरू करू अशी ग्वाही श्री.सामंत यांनी दिली.
शासकीय रुग्णालयातील रिक्तपदांचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जे डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यांनी रुग्णांना चांगली सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. दरम्यान जे डॉक्टर शासकीय सेवेत येतात. तेथे आपली खासगी प्रॅक्टिस सुरू करतात, तेथे जम बसल्यानंतर शासकीय सेवेला रामराम करतात. यात रूग्ण वार्यावर पडतात. त्यामुळे अल्पावधीत शासकीय रुग्णालयाची नोकरी सोडणार्या डॉक्टरांवर कडक कारवाई व्हावी. त्यांच्या डॉक्टर पेशाचे लायसन्स रद्द व्हावे अशी आपली आग्रही भूमिका असल्याचेही श्री.सामंत म्हणाले.
पालकमंत्री श्री.सामंत यांच्या उपजिल्हा रुग्णालय दौर्यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, नगरसेवक सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले आदी उपस्थित होते.