यशासाठी ‘आय कॅन डू’ सारखी भावना मनात रुजवली पाहिजे – सदाशिव पांचाळ…

2

वैभववाडी.ता,११: “आय कॅन डू”, “आय व्हील डू” या संकल्पना मनात रूजवून स्वत:वर विश्वास ठेवून प्रयत्नांची पराकाष्ठा प्रामाणिकपणे केल्यास आपल्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असे प्रतिपादन  माईंड ट्रेनर व मोटीव्हेशनल स्पिकर सदाशिव पांचाळ यांनी केले.
वैभववाडी तालुक्यातील कुर्ली माध्यमिक विद्यालयात परीक्षेपूर्वीची मानसिक तयारी या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सदाशिव पांचाळ हे प्रमुख वक्ते या नात्याने बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सावंत शाळा समितीचे सदस्य मोहन पडवळ, मुख्याध्यापक के.एम.,शेट्टी, सहाय्यक शिक्षक सुरेश देसाई आदी उपस्थित होते. या कार्यशाळेला आठवी ते दहावीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थ्यीनी उपस्थित होते.
आपल्याला यश मिळावे, यासाठी आपले पालक रात्रीचा दिवस करत काबाडकष्ट करत असतात. आपल्याला यश मिळाले, तर त्यांना सर्वाधिक समाधान मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे ध्येय ठेवले पाहिजे, असेही सदाशिव पांचाळ पुढे म्हणाले.
आपले ध्येय ठरवताना विचार फार महत्त्वाचे असून जसा विचार कराल, त्यानुसार आपल्याला यश मिळेल. सकारात्मक विचार यशाच्या शक्यता वाढवतात, तर नकारात्मक विचार आपल्याला यशापासून दूर नेतात, अंतर्मन म्हणजे आपल्याला मिळालेले वरदान आहे, त्याचा योग्य वापर केल्यास यश सहज मिळू शकेल, असे दोन तासांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी सांगितले.
आपल्याला अशक्य वाटणारी गोष्ट सकारात्मक विचार करता कशी सहज शक्य होते, याची स्वत: प्रयोग केलेली उदाहरणे मुद्देसूद मांडून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम सदाशिव पांचाळ यांनी या कार्यशाळेत चोख बजावले. आपण सांगितलेल्या गोष्टी विज्ञानाशी कशा संबंधित आहेत, हे सांगत हासत खेळत दोन तास हे मार्गदर्शन सदाशिव पांचाळ यांनी केले.
सदाशिव पांचाळ यांचा हा कार्यक्रम प्रत्येक हायस्कूलने करायलाच हवा, जेणेकरून परीक्षेपर्यंतच्या काळात मानसिक तयारी कशी करता या बाबत मार्गदर्शन तर मिळेलच पण हा विषय पांचाळ यांनी अशा पद्धतीने मांडला आहे, कि तो आयुष्यभर विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालक आणि शिक्षकांना ही उपयोगी होईल, अशी प्रतिक्रिया शिक्षिका कांबळे यांनी कार्यक्रमानंतर दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक के .एम.शेट्टी यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख मोहन पडवळ यांनी तर आभार शिक्षक सुरेश देसाई यांनी मानले.

4

4