बांदावासीयांचा पोस्ट कार्यालयाला घेराव…

2

पोस्टमास्तर धारेवर;मृत सातोस्कर हीच्या कुंटूबियांना अरेरावीची उत्तरे दिल्याचा आरोप…

बांदा,ता.११: दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या बांद्यातील भाग्यश्री सातोस्कर या युवतीच्या नावे येथील विभागीय पोस्ट कार्यालयात पीएम सहायता निधीचे आलेले पत्र नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता परस्पर कुडाळ येथे पाठविल्याने संतप्त बांदावासीयांनी सरपंच अक्रम खान व उपसभापती शीतल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट कार्यालयाला घेरावो घालत पोस्टमास्तार रामचंद्र तारी यांना धारेवर धरले. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पोस्टमास्तर तारी यांनी पत्र स्वतः आणून देण्याचे आश्वासन दिल्याने घेरावो मागे घेण्यात आला.
मयत भाग्यश्री हिची बहीण रोशनी सातोस्कर ही पत्र घेण्यासाठी पोस्ट कार्यालयात गेली असता तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तिने याची कल्पना उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान यांना दिली. त्यानंतर खान व राऊळ यांनी ग्रामस्थांसाह याठिकाणी येत पोस्टमास्तर तारी यांना जाब विचारत धारेवर धरले. नियमानुसार सदरचे पत्र ७ दिवस कार्यालयात ठेवणे गरजेचे असताना तात्काळ हे पत्र कुडाळ येथे पाठविण्याचे प्रयोजन काय असा सवाल खान यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यालयातील महिला कर्मचारी नीता घोडगे यांनीच उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे रोशनी हिने सांगितल्याने घोडगे यांची तातडीने बदली करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.
यावेळी सुनील धामापूरकर, संतोष सावंत, संदीप सातोस्कर, बबन धुरी, रोहिणी सातोस्कर, ओंकार नाडकर्णी, सुदेश सातोस्कर, सुनील राऊळ, सचिन नाटेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

0

4