पीटर इंग्लंड चोरी प्रकरण:संशयितांकडून कपडे आणि रोख रक्कम हस्तगत
कणकवली, ता.११: शहरातील पीटर इंग्लंड या कापड दुकानात चोरी केलेल्या संशयितांनी बांदा येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. या पाच संशयितांकडून कापड दुकानातून चोरीस गेलेले कपडे आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. सावर्डे (रत्नागिरी) येथील मोबाईलचे दुकान फोडल्यानंतर रत्नागिरी पोलिसांना या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले होते.
मुंब्रा ठाणे परिसरातील महंमद करीम शेख (वय 19), रिझवान मोहम्मद खान (वय 27), मुमताज मिरहान शेख (वय 28), एजाज अली सफर खान अली (वय 25) आणि मुस्ताख खान (वय 34) या पाच संशयितांनी 21 जानेवारीच्या रात्री बांदा येथे घरफोडी केली. त्यानंतर ते पहाटे तीनच्या सुमारास कणकवलीत आले. शहरातील एस.एम.हायस्कूल नजीक असलेल्या पीटर इंग्लंड शोरूमची टेहेळणी केली आणि पहाटे चारच्या सुमारास या शोरूमधील ब्रँडेड कपडे आणि रोख रक्कम घेऊन त्यांनी रत्नागिरीला पलायन केले. त्यानंतर दुसर्या दिवशी पहाटे त्यांनी सावर्डे येथील एक मोबाईल शॉपी फोडली. त्यातील एक मोबाईल त्यांनी वापरात आला. त्यावरूनच रत्नागिरी पोलिसांनी वरील सर्व संशयितांना ठाणे-मुंब्रा परिसरातून ताब्यात घेतले. रत्नागिरी पोलिसांच्या तपासानंतर त्यांचा ताबा कणकवली पोलिसांकडे देण्यात आला. या चौकशीत त्यांनी बांदा येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.