धामापूर बौद्धवाडीत अनधिकृत वाळू वाहतूक ग्रामस्थांनी रोखली…

2

ग्रामस्थ- वाळू व्यावसायिकांमध्ये शाब्दिक चकमक ; वातावरण तंग…

मालवण, ता. ११ : धामापूर रस्त्यावर अनधिकृतपणे सुरू असलेली डंपर वाहतूक धामापूर बौद्धवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी आज रात्री रोखून धरल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे वातावरण तंग बनले आहे. रात्री उशिरापर्यंत स्थानिक ग्रामस्थ व डंपर व्यवसायिक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती.
आंबेरी व कर्ली खाडीतून सध्या मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळूचा उपसा सुरू असून रात्रीच्या वेळेस धामापूर रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात डंपरची अवैधरित्या वाहतूक सुरू असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. धामापूर रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी बौद्धवाडी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून बौद्धवाडीतील विहिरींचे पाणीही धुळीमुळे अशुद्ध बनले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणी संबंधित वाळू व्यवसायिकांना आमचा तुमच्या व्यवसायाला कोणताही विरोध नाही मात्र वाहतूक करण्यापूर्वी धूळ उडू नये त्यासाठी रस्त्यावर पाण्याचा मारा करावा शिवाय अरुंद रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू ठेवावी जेणेकरून अपघात टळतील असे सांगितले. या विषयावरून काल बौद्धवाडी येथील एका तरुणासोबत वाळू व्यावसायिकाची शाब्दिक चकमक उडाल्याचे कळते. यात त्या तरुणाला मारण्याची धमकी देण्यात आल्याने बौद्धवाडीतील संतप्त ग्रामस्थांनी आज रात्री अवैधरित्या सुरू असलेली डंपर वाहतूक रोखून धरली. यामुळे धामापूर बौद्धवाडी रस्त्यावर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ व डंपर व्यवसायिक यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

3

4