पाडलोस,केणीवाडीतील विद्यार्थी;खासगी वाहनाने गाठली शाळा…
बांदा.ता,१२:
बांदा-शिरोडा मार्गावरून सावंतवाडी आगाराच्या एसटी गाड्या धावतात. बुधवारी सकाळी सातार्डा येथून सुटलेली सातार्डा पाडलोस मार्गे सावंतवाडी एसटी बस न्हावेली-रेवटेवाडी व पाडलोस-केणीवाडा येथे वेळेअगोदरच आल्याने विद्यार्थ्यांना स्वखर्चाने खासगी वाहनाने शाळा गाठावी लागली. त्यामुळे एसटीच्या भरवशावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना सध्या अनियमित धावणाऱ्या एसटीचा फटका बसत आहे.
पाडलोस-केणीवाडा व न्हावेली-रेवटेवाडी येथून सकाळी मडुरा हायस्कूल व बांदा महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. दोन अठवड्यापूर्वी वेळेअगोदर ७ मिनीटे आलेल्या सातार्डा पाडलोस मार्गे सावंतवाडी या एसटीला विद्यार्थिनीने हात दाखवला असता न थांबविण्याचा प्रकार घडला. याची माहिती सावंतवाडी आगारात तिच्या पालकांनी दिली होती. त्यावेळी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी संबंधितांना योग्य ती सूचना केली होती. परंतु आज सकाळी तसाच प्रकार घडल्याने शाळकरी मुलांच्या होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ तसेच पालकांमधून केला जात आहे.
एकीकडे ‘हात दाखवा एसटी थांबवा’ असे एसटी महामंडळाद्वारे सांगितले जाते तर दुसरीकडे हात दाखवून सुद्धा एसटी थांबवत नसल्याने अशा उक्तींना प्रशासनाकडूनच मुठमाती देण्याचा प्रकार होत असल्याचे पाडलोस माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष महेश कुबल यांनी सांगितले. दरम्यान, सावंतवाडी एसटी स्थानकप्रमुख विशाल शेवाळे यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित एसटी वाहक-चालकांना सकाळच्यावेळी पंधरा मिनिटे उशिरा सुटण्यास सांगितल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापुढे असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.



