श्रीदेव रामेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज-भवानी माता त्रैवार्षिक भेट सोहळा…

2

१४ रोजीच्या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे ; देवस्थान मंडळाचे परब-राणे यांचे आवाहन…

मालवण, ता. १२ : श्रीदेव रामेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज व भवानी माता यांचा पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळा १४ फेब्रुवारीला होत आहे. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीदेव रामेश्‍वर देवस्थान व परिसर देवालये विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे यांनी केले आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची कुलस्वामीनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक पारंपरिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्रीदेव रामेश्‍वर आपल्या वारेसूत्र, तरंग, रयतेसह किल्ले सिंधुदुर्ग येथे १४ तारखेला सकाळी नऊ वाजता कांदळगाव येथून रवाना होणार आहे. या त्रैवार्षिक सोहळ्यानिमित्त उद्या सायंकाळी सात वाजता गाथा कांदळगावची, महती रामेश्‍वराची या उमेश कोदे लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. रात्री आठ वाजता सद्गुरू प्रासादिक भजन मंडळ अणसूर वेंगुर्ले यांचे शिवशाहीवर आधारित संगीत भजन रामेश्‍वर देवालय येथे होणार आहे.
१४ तारखेला सकाळी नऊ वाजता श्रीदेव रामेश्‍वराचे आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह मालवण येथे प्रयाण होणार आहे. दुपारी बारा वाजता जोशीमांड मेढा येथे प्रस्थान व अल्पोपहार होईल. त्यानंतर समुद्रमार्गे किल्ले सिंधुदुर्ग येथे श्रीदेव रामेश्‍वर, शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक भेट सोहळा होईल. सायंकाळी चार वाजल्यानंतर श्रीदेव दांडेश्‍वर मंदिर दांडी येथे आगमन, रात्री मौनीनाथ मंदिर मेढा मालवण येथे मुक्काम होईल. १५ तारखेला सकाळी आठ वाजता कुशेवाडा मेढा येथे प्रकाश कुशे यांच्या घरी कुशे कुटुंबीयांना पारंपरिक भेट व आर्शिवचन, दहा वाजता रामेश्‍वर मांड बाजारपेठ येथे आगमन, बारा वाजल्यानंतर रामेश्‍वर मांड मंडळाच्यावतीने उमेश नेरुरकर यांच्या निवासस्थानी महाप्रसाद होईल. सायंकाळी चार वाजता रामेश्‍वर मांड येथून रामेश्‍वर मंदिर कांदळगाव येथे प्रयाण होईल. भाविकांना किल्ले सिंधुदुर्ग येथे नेण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र आचरेकर यांच्यावतीने मोफत होड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ऐतिहासिक भेट सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

6

4