सुवर्णकार समाजाने संघटितरीत्या बदलत्या आव्हानांना सामोरे जावे…

2

सुभाष गोवेकर; बांद्यात नरहरी सोनार व नाना शंकरशेठ पुण्यतिथी उत्साहात…

बांदा.ता,१४:  सुवर्णकार समाजाने संघटितरित्या बदलत्या आव्हानांना सामोरे जावे. समाजातील गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे. संत नरहरि सोनार व समाजश्रेष्ठी नाना शंकरशेठ ही सुवर्णकार समाजाला लाभलेली दिव्य रत्ने आहेत. नाना शंकरशेठ यांचे कार्य अलौकिक आहे. आज देशात कित्येकांना विविध क्षेत्रातील कार्याबद्दल हयात असताना अथवा मरणोत्तर पद्म अथवा भारतरत्न पुरस्कार मिळत  असताना नाना शंकरशेठ यांचे महान कार्य मात्र  उपेक्षितच राहिले आहे. सुवर्णकार समाजाने संघटित प्रयास करुन नाना शंकरशेठ यांची किर्ती सर्वत्र पसरविण्याची गरज अाहे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष गोवेकर यांनी येथे केले.
बांदा सुवर्णकार समाजाच्या वतीने  प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित संत नरहरी सोनार पुण्यतिथी व समाजश्रेष्ठी नाना शंकरशेठ पुण्यस्मरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन गोवेकर बोलत होते.
बांदा व्यापारी भुवन येथिल श्री विठ्ठल रखुमाई मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर बांदा सुवर्णकार समाज अध्यक्ष रविंद्र मालवणकर, उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर, सल्लागार अण्णा धारगळकर, माजी मुख्याध्यापक हनुमंत मालवणकर, महिला अध्यक्ष सुचिता चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन तसेच संत नरहरी सोनार व नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमांचे पुजन करुन कार्यक्रमास आरंभ झाला.
सदस्य कै. बाबा धारगळकर व कै. रत्नप्रभा पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविक मंगलदास साळगांवकर यांनी केले. यावेळी डॉ. आशुता आपा चिंदरकर, नरेश विश्वनाथ  आकेरकर, अवधुत संतोष चिंदरकर व  अथर्व प्रसाद चिंदरकर या समाजातील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हनुमंत मालवणकर यांनी आपल्या मनोगतात संत नरहरी सोनार यांचा जीवनपट सांगितला. संत नरहरी सोनार तसेच नाना शंकरशेठ यांच्यावरील पुस्तके व साहित्य वाचन करुन समाजाने त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यायचे आवाहन त्यांनी केले. रविंद्र मालवणकर यांनी या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल समाजबांधवांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री धारगळकर यांनी तर आभारप्रदर्शन अर्चना साळगांवकर यांनी केले.
यावेळी सुवर्णकार समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त वीणा दळवी संचलित श्री राधाकृष्ण संगीत साधना, सिंधुदुर्ग प्रस्तुत संगीत संध्या या कार्यक्रमास संगीत रसिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

6

4