श्री वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेचा कार्यक्रम
वेंगुर्ले.ता.१३:
जिल्हा परिषद श्री. वेताळ विद्यामंदिर तुळस शाळेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देण्याच्या उद्देशाने कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिर, आंबेरी येथील तपोवन कृष्णमंदिर, निळेली येथील पशू पैदास केंद्र, स्वप्ननगरी प्रकल्प, निळेली धरण, पिंगुळी येथील ड्रिमलॅंड गार्डन या ठिकाणी क्षेत्रभेटींचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्ययन अनुभव दिले.
विद्यार्थ्यांनी माणगाव येथील दत्त मंदिर व आंबेरी श्रीकृष्ण मंदिर या धार्मिक स्थळांची भेट घेऊन या क्षेत्रांचे अध्यात्मिक महत्व जाणून घेतले. निळेली येथील पशू पैदास केंद्रातील अॅजोला प्रकल्प, सेंद्रिय गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, विविध जातीच्या गायी, बैल व शेळीपालन, चा-याचे विविध प्रकार, नर्सरी इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटीतून माहिती देण्यात आली. विकलांग बांधवाना रोजगार निर्माण करून देणा-या स्वप्ननगरी संस्थेतील विकलांग बांधवांनी चालवलेला काजू फळ प्रक्रिया प्रकल्प, विविध प्रकारची शेती, पशूपालन याची माहिती मिळवून विकलांग बांधवांशी हीतगुज केली. निळेली येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाला भेट देऊन धरण कसे असते, पाणी पुरवठा कसा केला जातो, पाणीसाठ्याचा विसर्ग कसा केला जातो, पाणी कसे आणि कोणत्या एककात मोजले जाते, धरणाच्या पाण्यावर केली जाणारी शेती इ. विषयी माहिती देण्यात आली. शेवटी मुलांनी कुडाळ येथील ड्रीमलॅंड गार्डनमध्ये विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटला. पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पना प्रत्यक्ष क्षेत्रभेटीतून समजाव्यात यासाठी शिक्षक व पालकांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.