सेवानिवृत्त पोलिसाला ५० हजाराचा गंडा

2

एटीएम क्रमांक आणि पासवर्ड विचारून फसवणूक

कणकवली, ता.13 ः मुंबई पोलिस सेवेतून निवृत्त झालेल्या एकाला एटीएमचा क्रमांक आणि पासवर्ड विचारून 50 हजाराचा गंडा घालण्यात आला आहे. बँक ऑफ इंडियामधून बोलतोय असे सांगून अज्ञात भामट्याने ही फसवणूक केली. याबाबत फोंडाघाट येथील मनोहर सावंत यांनी आज येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
फसवणूक झालेले श्री.सावंत यांना 4 डिसेंबरला एक फोन आला होता. त्यामध्ये तुमचे बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट ब्लॉक झाले आहे असे सांगून एटीएम क्रमांक आणि त्यामागे असलेल्या सीसीव्ही क्रमांक विचारण्यात आला. त्यानंतर पासवर्ड देखील विचारण्यात आला. ही माहिती दिल्यानंतर 4 डिसेंबरला 25 हजार आणि 5 डिसेंबरला 25 हजार असे एकूण 50 हजार रक्कम मनोहर सावंत यांच्या बँक खात्यामधून काढण्यात आली होती. ही बाब श्री.सावंत यांच्या उशिरा लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आज आपली फसवणूक झाल्याची तक्रार येथील पोलिस ठाण्यात नोंद केली.

1

4