श्री देव रामेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज भेट सोहळा दिमाखात…

2

मालवण बनले भक्तिमय : छत्रपतींना रामेश्वराकडून मानाचा जिरेटोप बहाल…

मालवण, ता. १४ : कांदळगावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज व आदीमाया भवानी माता यांचा ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत उल्हासपूर्ण वातावरणात झाला. भेट सोहळ्यात किल्ले सिंधुदुर्गवर श्री रामेश्‍वराकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा जिरेटोप घालण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्यामुळे कांदळगाव, कोळंबसह शहर परिसर भक्तीमय बनला होता. सायंकाळी उशिरा श्रीदेव रामेश्‍वर मेढ्यातील मौनीनाथ महाराज मंदिर येथे मुक्कामास थांबले होते. उद्या सायंकाळी या सोहळ्याची सांगता होणार आहे.
श्रीदेव रामेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज, भवानी मातेच्या त्रैवार्षिक भेट सोहळ्याची सुरवात आज सकाळी कांदळगाव येथील श्रीदेव रामेश्‍वर मंदिर येथून झाली. श्रीदेव रामेश्‍वर वारेसूत्र, तरंग व रयतेसह कांदळगाव येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीसाठी ढोल-ताशांच्या गजरात रवाना झाला. या सोहळ्यात देवस्थानचे अध्यक्ष शिवराम परब, सचिव उदय राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, देवस्थानचे सर्व मानकरी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुरवातीस कोळंब खडवण येथे राजू जाधव मित्रमंडळाच्यावतीने श्रीदेव रामेश्‍वरासह अन्य देवतांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेरकर कुटुंबीयांच्यावतीने कोळंब येथे देवतांचे स्वागत झाले. भेट सोहळ्याच्या निमित्ताने रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळ्या, गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. कोळंब येथे देवतांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कोळंब ग्रामपंचायत तसेच स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने कोळंब हद्दीत देवतांचे स्वागत झाले.
धुरीवाडा येथील वेशीवर रामेश्‍वर मांड, जोशी मांड यांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, भाजप शहराध्यक्ष दीपक पाटकर, उमेश नेरूरकर, नाना पारकर यांच्यासह शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक भेट सोहळ्यात हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यानिमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. देवतांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे दिसून येत होते.
धुरीवाडा येथे देवतांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. भेट सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी कोळंब येथे कोळंबकर कुटुंबीय, फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक संघटनेच्यावतीने मोफत शीतपेय उपलब्ध करून देण्यात आले होते. अन्य ठिकाणीही भाविकांसाठी शीतपेय, नाश्ताची सोय उपलब्ध करण्यात आली होती.
फोवकांडा पिंपळ येथून या सर्व देवता जोशी मांड येथे रवाना झाल्या. दुपारी महाप्रसाद झाल्यानंतर श्रीदेव रामेश्‍वरसह अन्य देवता होडीतून किल्ले सिंधुदुर्ग येथे दाखल झाल्या. किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटना, शिवशक्ती जलपर्यटन संस्था, रामचंद्र आचरेकर यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत होड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. किल्ले सिंधुदुर्गवर श्रीदेव रामेश्‍वराचे किल्ला रहिवाशांच्यावतीने जल्लोषी स्वागत करण्यात आले. सर्व धार्मिक विधी पार पडल्यावर श्रीदेव रामेश्‍वर-छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक भेट सोहळा पार पडला. यावेळी श्रीदेव रामेश्‍वराच्यावतीने छत्रपतींनी मानाचा जिरेटोप घालण्यात आला. यानंतर श्रीदेव रामेश्‍वर आदीमाया भवानी माता यांचीही भेट झाली.
सायंकाळी श्रीदेव रामेश्‍वर किल्ले सिंधुदुर्गवर दांडी येथे दांडेश्‍वराच्या दर्शनासाठी रवाना झाला. यानंतर सायंकाळी उशिरा या सर्व देवता मेढ्यातील मौनीनाथ महाराज मंदिर येथे दाखल झाल्या. उद्या सकाळी कुशेवाडा येथील भेटीनंतर बाजारपेठेतील रामेश्‍वर मांड येथे श्रीदेव रामेश्‍वर थांबणार आहे. महाप्रसादाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी श्रीदेव रामेश्‍वर अन्य देवता, तरंग, वारेसूत्र व रयतेसह पुन्हा माघारी कांदळगाव येथे परतणार आहे.

3

4