अखेर तारकर्ली ग्रामपंचायतीचे टाळे पोलिस बंदोबस्तात काढले…

2

उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांचा विरोध मावळला…

मालवण, ता. १५ : तारकर्ली ग्रामपंचायतीस तीन दिवसांपूर्वी अज्ञाताने लावलेले टाळे आज सायंकाळी पोलिस बंदोबस्तात पंचायत समिती प्रशासनाच्यावतीने काढण्यात आले. गटविकास अधिकारी तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आज दुपारी स्थानिक ग्रामस्थांना केलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे ग्रामस्थांचा विरोध मावळला. त्यामुळे गेले चार दिवस ग्रामस्थ व तारकर्ली ग्रामपंचायत यांच्यातील वादावर पडदा पडला.
तारकर्ली ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेत अजेंड्यावरील विषयांवर चर्चा न करता सरपंचांनी सभात्याग केल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी तीन दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत पंचायत समिती प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी गावात येत ग्रामस्थांच्या प्रश्‍नांचे निरसन करत नाहीत तोपर्यंत टाळे काढू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. याप्रकरणाची माहिती ग्रामसेवकांनी गटविकास अधिकार्‍यांना दिल्यानंतर त्यांनी ग्रामसेवक एस. एस. चौरे यांना पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला.
दोन दिवसांपूर्वी पोलिस कर्मचारी पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत टाळे काढण्यास गेले होते. मात्र ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे पंचायत समिती प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी केवळ पंचनामा केला. यामुळे पोलिसांनाही माघारी परतावे लागले. हा वाद मिटविण्यासाठी राजकीय पक्षांचे पदाधिकारीही गावात गेले होते. मात्र ग्रामस्थांनी त्यांना हा ग्रामस्थांचा विषय असल्याने कोणतेही राजकारण करू नये सांगत त्यांना तेथून जाण्यास सांगितले. या प्रकरणासंदर्भात काल सायंकाळी उशिरा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्थानिक ग्रामस्थांसमवेत बैठक घेत त्यांचे म्हणणे जाणून घेत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतीस टाळे असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने श्री. पराडकर यांनी आज पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायतीस ठोकलेले टाळे काढण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या. दुपारी स्वतः उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पराडकर यांनी तारकर्लीत जात उपस्थित ग्रामस्थांना प्रशासनाचे म्हणणे पटवून देत योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे ग्रामस्थांनी विरोध मागे घेतला. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात ग्रामपंचायतीस बसविलेले टाळे काढण्यात आले. त्यामुळे अखेर या वादावर पडदा पडला.

1

4