भाजपकडून आंगणेवाडीत दिव्यांग, वयोवृद्धांसाठी व्हीलचेअरची सुविधा…

2

अतुल काळसेकर ; मोफत नेत्रचिकित्सा, चष्मा वाटप, मधुमेह तपासणी शिबीर…

मालवण, ता. १५ : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मागील १३ वर्षे आंगणेवाडी यात्रेत मोफत नेत्रतपासणी, चष्मा वाटप शिबीर भरविले जात आहे. त्याचबरोबर मधुमेह रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे अपंग, वयोवृद्ध भाविकांना देखील यात्रेनिमित्त देवीच्या दर्शनाचा लाभ मिळण्यासाठी भाजपच्यावतीने आंगणेवाडीतील कणकवली आणि मालवण बसस्थानक येथे मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत अशी माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
मालवण तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, महेश मांजरेकर, अवि सामंत, बाबा परब, विजय केनवडेकर, दादा वाघ यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. काळसेकर म्हणाले, आंगणेवाडी यात्रेत भाजपच्यावतीने स्वागत कक्ष उभारला आहे. त्याचे उदघाटन १७ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत होणार आहे. यंदा यात्रेला भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. आमदार राणे हे सकाळी आठ वाजल्यापासून उपस्थित राहणार आहे. सकाळी दहा वाजता माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार उपस्थित राहतील. साडे अकरा वाजता खासदार नारायण राणे उपस्थित राहतील. सायंकाळी पाच ते रात्री दहा यावेळेत माजी मंत्री रवींद्र चव्हाण, प्रसाद लाड उपस्थित राहतील.
आंगणेवाडी यात्रेत दरवर्षी प्रमाणे यंदाही मोफत नेत्रतपासणी व चष्मा वाटप होणार आहे. तर यंदापासून दिव्यांगाना आंगणेवाडी यात्रेत कणकवली व मालवण बसस्थानक येथून मोफत व्हीलचेअर उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी भाविकांनी स्वागत कक्षाशी संपर्क साधावा अथवा व्हीलचेअरच्या आगाऊ बुकिंगसाठी दिव्यांग आणि वयोवृध्दाना महेश मांजरेकर (९४०४३९६१५५), धोंडी चिंदरकर (९८३४४४८४५७), विजय केनवडेकर (९४२०२०६८७३), बंड्या सावंत (९४२२६३३३१७)यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

5

4