वेंगुर्लेत शिष्यवृत्ती परीक्षेला बसविले परजिल्ह्यातील बोगस विध्यार्थी…

2

तुळस केंद्रावर प्रकार उघड;शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचा कुबलांचा इशारा…

वेंगुर्ले,ता.१६: वेंगुर्ले तालुक्यातील तुळस हायस्कुलमधील सेंटरवर आज घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्या बाहेरील सुमारे २० ते २२ विध्यार्थी अनधिकृत पणे बोगस बसविण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.दरम्यान याबाबत जि.प.सदस्य दादा कुबल यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असून आपण शिक्षणाधिकाऱ्यांकडे या बाबत तक्रार करणार असल्याचे श्री. कुबल यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्यात आज सर्वत्र शासनमान्य शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या. इयत्ता ५ व ८ मधील विद्यार्थी या परीक्षेला बसवली जातात. वेंगुर्ले तालुक्यातील तुळस हायस्कुल मधील सेंटर मध्ये आज जे विध्यार्थी बसविण्यात आले, त्यामधील अनेक विध्यार्थी अनोळखी असल्याचे दिसून आले. पालकांनी त्या विध्यार्थ्यांची चौकशी केली असता, ती बरीच मुले ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नसून कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याचे निदर्शनास आली. त्यामुळे पालकांनी या बाबत आवाज उठवीत त्या मुलांना या सेंटरवर परीक्षेला बसण्याची परवानगी कोणी दिली, याचा जाब विचारत आहेत.
दरम्यान जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य दादा कुबल यांना या बाबत माहिती मिळताच त्यांनी या हायस्कूल मध्ये धाव घेत पाहणी केली. तसेच या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ही मुले मातोंड हायस्कुलच्या नावावर बसल्याचे समोर आले आहे. येथील मुलांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. शाळेत या परीक्षेच्या सराव परीक्षा होतात त्या वेळी या शाळेतील मुलांकडून एका वेळी एका विषयाच्या ती किंवा चार पेपर लिहून घेतात. त्या पेपरवर वेगळ्या मुलांची नावे आसतात असे या वेळी मुलांनी पालकांशी बोलताना सांगितले. यावेळी श्री. कुबल यांच्यासह परबवाडा सरपंच पपु परब, तुळस चे माजी सरपंच आपा परब, सदस्य शेखर तुळसकर यांच्यासह पालक उपस्थित होते.
घाटमाथ्यावरील मुले या परीक्षेत मेरिट मध्ये यावीत यासाठी त्यांना वर्षभर या परीक्षेच्या क्लास ला बसविले जाते आणि अशा पद्धतीने एखाद्या शाळेतून त्यांना परीक्षेला बसविण्यात येते. या प्रकारामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या हायस्कुलच्या भूमिकेवर शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे.

दरम्यान सभापती अनुश्री कांबळी यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.

 

4

4