भराडी मातेच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज

2

आंगणेवाडी नगरी सजली ; मंदिरावर आकर्षक रोषणाई…

मालवण, ता. १६ : दक्षिण कोकणची काशी तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवार १७ रोजी पहाटे ३ वाजल्यापासून प्रारंभ होणाऱ्या यात्रोत्सवास अवघे काही तास शिल्लक राहिले असून आंगणेवाडी व आंगणे कुटुंबीय भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.
भराडी देवी मंदिरात अत्यंत आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात येत आहे. तर मंदिरांसह संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघण्यास सुरवात झाली आहे. भाविकांना देवीचे लवकर व सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंडळाच्या वतीने ९ रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या धर्तीवर देवी मुख दर्शनासाठीही एक विशेष रांग असणार आहे.
गेले महिनाभर आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ, ग्रामपंचायत तसेच प्रशासनाच्यावतीने यात्रोत्सवाची तयारी सुरू आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आंगणेवाडी मंदिर परिसरात हॉटेल्स, मिठाई, मालवणी खाजा तसेच अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्याचबरोबर बच्चे कंपनीचे आकर्षण ठरणारा आकाश पाळणा तसेच अन्य मनोरंजनाचे विविधप्रकार दाखल झाले आहेत.
आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वे, एसटी बस, खासगी गाड्यांनी चाकरमानी दाखल होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील वर्दळ वाढली आहे. आंगणेवाडीत आतापासूनच यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे.
यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर एसटी प्रशासनाच्यावतीने खास नियोजन करण्यात आले आहे. शहरातील बसस्थानक तसेच अन्य ठिकाणाहून थेट आंगणेवाडी येथे मध्यरात्रीपासून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. त्याचबरोबर परतीच्या प्रवासासाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, सिने कलावंत यांची उपस्थिती असते. यावर्षी नेतेमंडळींची मोठी मांदियाळी दिसून येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. आंगणेवाडी परिसरासह मंदिराला जोडणारे रस्ते, शहर तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये झेंडे, बॅनर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले असून जोरदार वातावरण निर्मिती करण्यात आली आहे.  विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध पक्षांनी भाविकांच्या स्वागतासाठी आपले कक्षही उभारले आहेत.
१७ फेब्रुवारीला पहाटे देवीचे दर्शन व ओटी भरणा सुरू होणार असून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. रात्री ९ ते मध्यरात्री १ पर्यंत धार्मिक कार्यक्रमासाठी देवीदर्शन बंद राहणार आहे.  या काळात ओट्या भरणे बंद राहणार असून एक वाजल्यापासून पुन्हा ओट्या भरण्याच्या कार्यक्रमास सुरवात होणार आहे.
शांतता व सुव्यस्था रहावी यासाठी पोलिस यंत्रणाही सज्ज झाली आहे. पोलिस अधिकारी व शेकडो कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिसांचे फिरते गस्ती पथकही कार्यरत राहणार आहे. यासह महसूल, पंचायत समिती प्रशासनाच्यावतीनेही आरोग्य तसेच अन्य सोयी सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.
मंडळाच्या वतीने गेली दोन वर्षी सीसीटीव्ही च्या माध्यमातून यात्रेवर लक्ष ठेवले जात आहे. तर ड्रोन कॅमेराचा वापर करून यात्रेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. यावर्षीही मंदिर व यात्रा परिसरात सिसिटीव्ही कॅमेरासह यात्रेचे ड्रोन चित्रीकरण होणार आहे. यासाठी आंगणे कुटुंबीय मेहनत घेत आहेत.
दिव्यांग तसेच चालणे शक्य नसलेल्या वयोवृद्ध भाविकांना मंदिरापर्यंत आणण्यासाठी आंगणेवाडी मंडळाच्या वतीने मालवण व कणकवली या वाहनतळ ठिकाणावरून रिक्षा व्यवस्था थेट मंदिरापर्यंत करण्यात आली आहे. अशी माहिती आंगणे कुटुंबियांनी दिली.
आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ रोजी दुपारी भराडी देवीच्या दर्शनास येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठीही जिल्ह्यासह मालवणनगरी सज्ज होत आहे. प्रशासनाने सुरक्षेबरोबरच चोख नियोजन केले आहे. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या व भाविकांच्या  स्वागतासाठी आंगणेवाडीसह सर्वत्र स्वागत कमानी स्वागत फलक व भगवे ध्वज उभारले जात आहेत. आंगणेवाडीसह संपूर्ण तालुक्यात भगवा उत्साह पसरला आहे.

4

4