सागरी अभयारण्यप्रश्नी पालिकेलाही हवे मार्गदर्शन…

2

मच्छीमार वसाहतींचाही प्रश्न उपस्थित ; मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर…

मालवण, ता. २१ : सीआरझेड नकाशामध्ये दाखविण्यात आलेल्या मालवण सागरी अभयारण्याबाबत नगरपालिकेनेही शासनाकडे माहिती देण्याची मागणी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केले आहे.
सीआरझेड अस्तित्वात यायच्या अगोदरपासून वर्षानुवर्षे किनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या मच्छीमारांच्या वसाहतींचा अर्थात कोळीवाड्यांचा सीआरझेड नकाशात अंतर्भाव नसल्याचा मुद्दाही नगराध्यक्षांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री मालवण दौऱ्यावर आले असता नगराध्यक्षांनी सीआरझेड संदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना सादर केले. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने १८ जानेवारी २०१९ रोजी जाहीर केलेल्या नवीन सीआरझेड अधिसूचनेनुसार प्रसारीत करण्यात आलेल्या किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्रारुप आराखड्यात मालवणातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासभोवतालच्या समुद्रात सागरी अभयारण्य दाखविण्यात आले आहे. मालवणचे मासेमारी बंदर याच भागात आहे. त्यामुळे सागरी अभयारण्य झाल्यास मालवणातील मच्छीमारांचे भवितव्य काय? असा सवाल मच्छीमारांना पडला असून याबाबत शासनाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी पारंपरिक मच्छीमारांसाठी कार्यरत असलेले स्थानिक रहिवासी महेंद्र पराडकर यांनी केली होती.
गेल्या पंधरा वर्षात या भागातील दुर्मिळ प्रवाळ समूहावर अवलंबून असलेला स्कुबा डायव्हिंगसारखा पर्यटन व्यवसाय बऱ्यापैकी स्थिरावलेला आहे. याठिकाणी पर्यटनातील साहसी जलक्रीडा प्रकारही पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे या भागातील मासेमारी व पर्यटन व्यवसायाविषयी शासनाचे धोरण काय राहील याची स्पष्टोक्ती आवश्यक असल्याचा मुद्दाही मांडला गेला होता. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षांनी सादर केलेल्या निवेदनात हे सर्व मुद्दे अंतर्भूत केले आहेत. आता याबाबत शासनाकडून मार्गदर्शन केव्हा होते याकडे मच्छीमारांचे लक्ष लागून आहे. सीआरझेड नकाशावर हरकती व सूचना नोंदविण्याची अंतिम तारीख १३ मार्च आहे. यासंदर्भात राज्याचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्याची मागणी मच्छीमारांमधून होत आहे.

8

4