जखमीला रुग्णालयात केले दाखल; चक्क बनला रुग्णवाहिका चालक..
सावंतवाडी ता.२४: खेळण्या-बागडण्याच्या वयात आपल्या आईचा वसा घेऊन नेहमीच समाजकार्यात पुढे असलेल्या अखिलेश कोरगावकर या युवकाने आज समाजासमोर एक वेगळाचं आदर्श ठेवला.एका अत्यवस्थ रुग्णाला तात्काळ बांबुळी रुग्णालयात हलविण्यासाठी येथील कुटीर रुग्णालयातून रुग्णाच्या नातेवाईकांचा खाजगी रुग्णवाहिकेसाठी कोरगावकर यांना संपर्क केला.यावेळी रुग्णवाहिका चालक सुट्टीवर असल्यामुळे चक्क अखिलेश स्वतः रुग्णवाहिका घेऊन रुग्णालयात दाखल झाला.व त्याने सुखरूप रुग्णाला बांबुळी रुग्णालयात दाखल केले.दरम्यान त्याच्या या अनोख्या समाजसेवेचे सगळीकडून कौतुक होत आहे.
सावंतवाडी पालिकेच्या उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांचा सुपुत्र अखिलेश कोरगावकर हा नेहमीच आपल्या आई समवेत समाजकार्यात पुढे राहिला आहे.तो सध्या बी.एम.एसचे शिक्षण घेत आहे.घरात गर्भश्रीमंत असतानासुद्धा इतरांप्रमाणे पैशाचा कोणताही माज न करता किंवा कोणत्याही वाममार्गाला न जाता तो समाजकार्यासाठी झटत आहे.याचाच प्रत्यय काल पुन्हा एकदा दिसून आला.हनुमंत नाईक या रुग्णाला तात्काळ बांबुळी नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती.दरम्यान खाजगी रुग्णवाहिकेसाठी रुग्णाच्या नातेवाईकांनी कोरगावकर कुटुंबियांशी संपर्क साधला.मात्र यावेळी त्यांच्या रुग्णवाहिकेचा चालक त्याठिकाणी उपलब्ध नसल्याने प्रसंगावधान दाखवून अखिलेश स्वतः रुग्णवाहिका चालक बनला व रुग्णाला घेऊन बांबूळी रुग्णालयात दाखल झाला.