२६ फेब्रुवारीला त्रिंबक येथे आयोजन…
मालवण, ता. २४ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद यांच्यावतीने तालुका क्रीडा परिषद आयोजित व राष्ट्रीय अँटी करप्शन अॅण्ड अँटी अॅट्रॉसिटी (टायगर फोर्स) संगठन सिंधुदुर्ग पुरस्कृत तालुकास्तरीय गो गर्ल गो शंभर मीटर धावणे स्पर्धा २६ फेब्रुवारीला जनता विद्यामंदिर त्रिंबक येथे सकाळी साडे नऊ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे यासाठी फीट इंडिया मुव्हमेंट, गो गर्ल गो योजनेद्वारे बेटी बचाओ, बेटी पढाओ, बेटी लिखाओ या उक्तीस अनुसरून मुलींच्या तंदुरुस्तीसाठी या शंभर मीटर धावणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक शाळेतून प्रत्येक गटात तीन खेळाडू सहभागी होऊ शकतात. तालुकास्तरावरील विजयी पहिल्या तीन क्रमांकांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. स्पर्धा ६ ते ९ वर्षे, १० ते १३ वर्षे, १४ ते १८ वर्षे अशा तीन गटात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा केवळ मुलींसाठी आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी स्पर्धास्थळी वेळीच उपस्थित राहावे. सोबत वयाचा दाखला असणे अनिवार्य आहे. ओळखपत्र, आधारकार्डसह शाळेच्या लेटरहेडवर प्रवेश अर्ज स्पर्धास्थळी सादर करायचा आहे. या स्पर्धेस जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी क्रीडा समन्वयक अजय शिंदे मोबा. ९४२२३९४१८६ यांच्याशी संपर्क साधावा.