आसोली न्हैचीआड शाळा बनली डिजिटल..

2

पुष्कराज कोले यांच्या सौजन्याने साहित्य भेट…

वेंगुर्ले,ता२६:

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली न्हैचीआड येथिल पु.प्रा.शाळा न्हैचीआड, आसोली या शाळेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कै.अँड.रामकृष्ण कोले यांच्या स्मरणार्थ श्री पुष्कराज कोले आणि रोटरी क्लब गोरेगाव मुंबई यांच्या सौजन्याने डिजीटल शाळेसाठीचे साहित्य पुरविण्यात आले होते या डिजिटल शाळेचे उदघाटन आज वेंगुर्लेचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते श्री पुष्कराज कोले आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, वेंगुर्ले पंचायत समिती सभापती सौ अनुश्री कांबळी, आसोली सरपंच सौ रिया कुडव, ग्रामपंचायत सदस्या पेरपेतीन डिसोझा, सेजल धुरी, सदस्य संकेत धुरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रभूआजगावकर आदि मान्यवर उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी बोलताना श्री पुष्कराज कोले यांनी आपल्या तालुक्यातील सर्व शाळा येत्या काही वर्षांत डिजीटल करण्याचा आपला प्रयत्न राहणार असून पुढील काही वर्षांत जिल्ह्यात विविध प्रकारची शैक्षणिक व अत्याधुनिक महाविद्यालये आणण्याचा मानस व्यक्त केला तर जि प सदस्य दादा कुबल यांनी या गावातील इतर शाळांप्रमाणे या शाळेला ही आपण जि.प.च्या माध्यमातून भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असुन या शाळेच्या इतर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना पंचायत समिती सभापती सौ अनुश्री कांबळी यांनी आजच्या काळात आपल्या मुलांसाठी डिजिटल शाळेची असणारी आवश्यकता, शाळेच्या प्रगतीसाठी, उत्कर्षासाठी शाळेतील शिक्षक, मुले, पालक, नागरिक यांनी एकत्रित आल्यास गावागावात शैक्षणिक वारे सुरु होऊन आपली मुले शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर राहणार आहेत असे स्पष्ट केले तसेच हि शाळा शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना गेल्या १०० वर्षात ज्या ज्ञात अज्ञातांनी शाळेसाठी जे जे सहकार्य केले त्यांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या उपशिक्षिका रेडकर मॅडम, सूत्रसंचालन श्री प्रकाश रेगे यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक प्रभूआजगांवकर यांनी मानले. यावेळी गावांतील नागरिक,पालक,शाळा व्यवस्थापन समितीचे आजी माजी पदाधिकारी, माता पालक संघ ,शिक्षक पालक संघ आजी माजी पदाधिकारी इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2

4