जिल्हा मुख्यालयातील क्रिकेट सामन्यात मुख्यालयातील पत्रकारांचा विजय…

2

 

 

कला क्रीडा महोत्सवाचे निमित्त;जिल्हा परिषद कर्मचारी अधिकारी व पत्रकारांच्यात रंगला सामना…

ओरोस,ता.२६: जिल्हा परिषदेच्या कर्मचारी-अधिकारी, पदाधिकारी यांच्यासाठी जिल्हा मुख्यालयात गुरुवारी सुरु झालेल्या कला व क्रीडा महोत्सवात मुख्यालय पत्रकार व अधिकारी-पदाधिकारी यांच्यामध्ये प्रदर्शनीय टेनिस बॉल क्रिकेट सामना झाला. या सामन्यात तीन चेंडू राखून मुख्यालय पत्रकार संघाने अधिकारी-पदाधिकारी संघावर रोमहर्षक विजय मिळविला.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा पोलिस क्रीडा मैदानावर मर्यादित सहा षटकांच्या संपन्न झालेल्या या सामन्याची नाणेफेक जिंकत अधिकारी-पदाधिकारी संघाने प्रथम फलंदाजी घेतली. अधिकारी-पदाधिकारी संघाने निर्धारित सहा षटकात 39 धावा केल्या. यात जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ यांचे सर्वाधिक एका धावांचे योगदान राहिले. त्यांनी एक चौकार लगावला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, जलसंधारण कार्यकारी अभियंता सुनील काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश जोंधळे, जिल्हा परिषद सदस्य अंकुश जाधव, विलास आरोंदेकर यांचे यात चांगले योगदान लाभले. पत्रकार संघाच्या गोलंदाजांनी चांगला मारा करीत 39 धावांवर रोखले. यात प्रशांत सावंत, अरुण अणावकर, गिरीश परब, विनोद दळवी यांनी गोलंदाजी केली. कप्तान संदीप गावडे, लवु म्हाडेश्वर, बाळ खडपकर, विनोद परब, नंदकुमार आयरे, मनोज वारंग, दत्तप्रसाद वालावलकर यांची क्षेत्ररक्षक म्हणून चांगली साथ लाभली.
जिंकण्यासाठी 40 धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुख्यालय पत्रकार संघाची सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकात एका गड्याच्या मोबादल्यात 7 धावा केल्या. दुसऱ्या षटकात 12 धावा घेत 19 धावा जमविल्या. त्यामुळे हा सामना एकतर्फी होणार असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तिसऱ्या षटकात संतोष गावडे यांनी सुरेख गोलंदाजी करीत मुख्यालय पत्रकार संघाचे दोन फलंदाज लागोपाठ बाद केले. त्यात भरवशाचा फलंदाज गिरीश परब यांचाही सहभाग होता. त्यामुळे या सामन्यात रोमांचक स्थिती निर्माण झाली. शेवटच्या सहाव्या सहा चेंडू सात धावा अशी स्थिती निर्माण झाली होती. शेवटच्या षटकात मैदानात असलेल्या बाळ खडपकर व मनोज वारंग यांनी चिकाटी दाखवत तीन चेंडू राखून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मुख्यालय पत्रकार संघाने सात गडी गमावत विजय संपादन केला. प्रशांत सावंत यांनी सर्वाधिक 15 धावांचे योगदान दिले. विनोद परब, लवु म्हाडेश्वर, अरुण अणावकर, नंदकुमार आयरे, संदीप गावडे यांनी फलंदाज म्हणून योगदान दिले. विजय संपादन केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वसेकर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यांनी मुख्यालय पत्रकार संघाचे अभिनंदन केले.

फोटो:-सिंधुदुर्गनगरी:अधिकारी-पदाधिकारी संघावर विजय मिलविल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर मुख्यालय पत्रकारांचे अभिनंदन करताना.

3

4