दारिद्र्य रेषेखालील दाखले मोफत, नाट्यगृह, पाणीपट्टी, अन्य दाखल्याच्या दरात वाढ ; १ एप्रिलपासून अंमलबजावणी…
मालवण, ता. २६ : मालवण पालिकेच्या सन २०२०-२१ या वर्षासाठीच्या ३२ कोटी ७ लाख ३ हजार ३२८ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास काही सुधारणांसह आजच्या पालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. यात दारिद्रय रेषेखालील दाखले लाभार्थ्यांना विनामूल्य दिले जाणार आहेत तर पालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने नाट्यगृह, रॉकगार्डन प्री वेडिंगसह अन्य विविध दाखल्यांच्या तसेच पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली असून याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे.
मालवण पालिकेची अर्थसंकल्पीय सभा नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गणेश कुशे, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, पंकज सादये, यतीन खोत, पूजा सरकारे, पूजा करलकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, सुनीता जाधव, तृप्ती मयेकर, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शिलकी अंदाजपत्रकात एकूण भांडवली खर्च ३९ कोटी ७८ लाख २६ हजार रुपये, एकूण जमा ८४ कोटी ५२ लाख ८३ हजार ८२८ रुपये, एकूण खर्च ५२ कोटी ४५ लाख ८० हजार ५०० रुपये तर अखेरची शिल्लक ३२ कोटी ७ लाख ३ हजार ३२८ रुपये एवढे दाखविण्यात आले आहे. त्यानुसार अखेरच्या शिलकीसह ३३ कोटी ७ लाख ३ हजार ३२८ रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकास आजच्या सभेत मान्यता देण्यात आली. दारिद्रय रेषेखालील दाखल्यांसाठी पूर्वी शुल्क आकारले जात होते. मात्र यापुढे दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना विनामूल्य दाखले उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी नाट्यगृहाच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून वातानुकुलितसाठी १० हजार रुपये, विनावातानुकुलितासाठी ७ हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला. रॉकगार्डनमध्ये प्री वेडिंग एक तासासाठी १ हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. याशिवाय विविध दाखल्यांसाठी नागरिकांना पूर्वीच्या दरापेक्षा मोठ्या प्रमाणात शुल्क द्यावे लागणार आहे.
पाणीपट्टीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. यात घरगुती वापरासाठी पालिका हद्दीत ३०० रुपये, पालिका हद्दीबाहेर ६०० रुपये, वाणिज्य वापरासाठी पालिका हद्दीत किमान १ हजार रुपये, पालिका हद्दीबाहेर १ हजार ५०० रुपये, औद्योगिक वापरासाठी पालिका हद्दीत ५ हजार रुपये, पालिका हद्दीबाहेर ६ हजार रुपये, सार्वजनिक इमारती, शासकीय संस्थांसाठी पालिका हद्दीत १ हजार रुपये, पालिका हद्दीबाहेर १ हजार ५०० रुपये, ग्रामपंचायत कार्यालय हजार लिटरसाठी ५० रुपये तर शासकीय तंत्रनिकेतनसाठी हजार लिटरसाठी ५० रुपये दर प्रत्येक महिन्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. हे दर १ एप्रिलपासून लागू होणार असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली.