मत्स्यव्यवसाय मंत्र्यांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध…

2

मच्छीमारांचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्यास तीव्र आंदोलन ; राजन तेली यांचा इशारा…

मालवण, ता. २७ : राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी राज्याच्या किनारपट्टीवर
मत्स्यदुष्काळ जाहीर करता येत नसल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक देत तीव्र नाराजी व्यक्त केली. मत्स्यदुष्काळ मोजण्याची पद्धत ब्रिटिशकालीन असून ती बदलण्यात यावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली. मच्छीमारांचे प्रश्‍न गांभीर्याने न घेतल्यास कोणत्याही क्षणी आंदोलन छेडण्याचा इशारा श्री. तेली यांनी यावेळी दिला.
भाजपाच्या शिष्टमंडळाने आज दुपारी सहाय्यक मत्स्य आयुक्त श्रीकांत वारुंजीकर यांची मत्स्य कार्यालयात भेट घेतली. यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. पारंपरिक मच्छीमार दुष्काळात होरपळत असताना या विभागाच्या जबाबदार मंत्र्यांकडून असे वक्तव्य होणे चुकीचे आहे असे तेली यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा मोडकर, कृष्णनाथ तांडेल, विलास हडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, बाबा परब, आबा हडकर, राजू आंबेरकर, महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, बबलू राऊत, पंकज पेडणेकर, दाजी सावजी, राजू परुळेकर, संदेश चव्हाण, हेमंत मिठबावकर आदी उपस्थित होते.
अधिकार्‍यांकडून मिळणार्‍या चुकीच्या आकडेवारीमुळे मत्स्यव्यवसाय मंत्री विधिमंडळात चुकीचे वक्तव्य करत आहेत. येथील बंदरात काही वर्षापूर्वी साडेतीनशे ते चारशे ट्रॉलर्स मासेमारी करत होते मात्र आज केवळ ८० ते ८५ ट्रॉलर्स समुद्रात उभे असून यातील किती ट्रॉलर्स रोज मासेमारीसाठी जातात हा संशोधनाचा विषय आहे. मत्स्य दुष्काळामुळे ट्रॉलर व्यावसायिक हतबल झाले आहेत. पारंपरिक मच्छीमारांच्या जाळ्यात मासळीच मिळत नसल्याने त्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत यंत्रणा किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ नाही असे कसे सांगू शकते असा प्रश्‍न तेलींनी उपस्थित केला.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या मनमानी कारभारामुळे मच्छीमार बेजार झाला आहे, त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची लाट पसरली असून याचा कधीही उद्रेक होऊ शकतो असा इशारा देण्यात आला. कृष्णनाथ तांडेल यांनी मत्स्यदुष्काळ मोजण्याचे निकष कोणते आहेत? असा प्रश्‍न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच जिल्हा दौर्‍यावर आले होते त्यांनी मच्छीमारांची फसवणूक केल्याचा आरोप अशोक सावंत यांनी केला.

7

4