Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामुलाच्या भल्यासाठी पक्षाच्या विरोधात कधीही काम केले नाही...

मुलाच्या भल्यासाठी पक्षाच्या विरोधात कधीही काम केले नाही…

विकास सावंतांनी सोडले मौन;माझ्यावर वार करणा-यावर दुप्पट वार करण्याची ताकद…

सावंतवाडी,ता.०१: मुलाच्या भल्यासाठी विकास सावंत पक्षाच्या विरोधात काम करत आहेत,अशी कोणी टीका करत असेल,तर मी गप्प बसणार नाही.यापूर्वीसुद्धा पक्षाच्या भल्यासाठी संघटना वाढविण्यासाठी मी काम केले आणि यापुढेही करत राहीन.परंतु ज्या व्यक्तीला प्रदेश काँग्रेसने कारवाईची नोटीस बजावली,अशा व्यक्तीचा सन्मान करणे हे कितपत योग्य आहे,असा सवाल आजच्या पक्षाच्या कार्यक्रमात मावळते जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी व्यक्त केला.आपण पक्षाच्या पडत्या काळात प्रामाणिकपणे पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम केले.परंतू काही लोकांनी सहकार्य केले नाही.उलट टीका करण्याचे काम केले.त्यामुळे माझ्यावर कोणी चुकीच्या पद्धतीने वार करत असेल तर मी त्यांच्यावर दुप्पट वार केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आज आपला पदभार स्वीकारला.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात श्री.सावंत यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली. गेले अनेक दिवस शांत असलेल्या सावंत यांनी त्याठिकाणी व्यासपीठावर असलेल्या प्रदेश सरचिटणीस राजन भोसले व अन्य पदाधिकारी यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले मी पक्षाच्या पडत्या काळात काँग्रेस सावरण्याचा प्रयत्न केला.मात्र सोशल मीडियावर अत्यंत खालच्या दर्जाची टीका माझ्यावर करण्यात आली.हा सर्व प्रकार मला माहित होता.परंतु केवळ काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद होऊ नये ,आणि झालेले वाद चव्हाट्यावर येऊ नये म्हणून मी गप्प राहिलो.माझ्यावर मी पुत्र प्रेमासाठी सहकार्य करतो असे आरोप करण्यात आले.मात्र मी निष्ठावंत कार्यकर्ता आहे.माझ्या नसानसात काॅग्रेस भिनलेली आहे.त्यामुळे काँग्रेसविरोधात जाऊन मी कधी काम केले नाही.त्यामुळे कोणी पाठिमागे वार करीत असतील तर मी गप्प बसणार नाही.माझ्यात दुप्पट वार करण्याची ताकद आहे.
श्री.सावंत पुढे म्हणाले,या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीत आज मला प्रदेश कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.परंतु नोटीस अद्याप पर्यंत माझ्याकडे पोहोचलेली नाही.ती कुठे हरवली हे मला माहीत नाही,परंतु ज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले,अशा व्यक्तीचा सन्मान करणे चुकीचे आहे .पक्षात ज्याच्यावर आरोप झाले अशा व्यक्तीचा सन्मान करून चुकीचा पायंडा कोणी घालू नये ,त्यामुळे आजचा सत्कार मी नाकारण्याचा निर्णय घेतला,परंतु या ठिकाणी कोणाचा अपमान होऊ नये,म्हणून मी सत्कार स्वीकारला,ही वस्तुस्थिती आहे.बाळा गावडे जिल्हाध्यक्ष झाले याचा मला आनंद आहे मी,जे सभापती आणि जिल्हाध्यक्ष पद भूषवले त्या ठिकाणी बाळा गावडे बसत आहेत.याचा मला सार्थ अभिमान आहे.बाळा गावडे कट्टर कार्यकर्ते माझ्या निवडणुकीत स्टीकर लावण्याचे काम त्यांनी केले होते.हे आज ही मी जाणतो,त्यामुळे प्रदेश काँग्रेसकडून बाळा गावडे यांचा केलेला गौरव हा योग्यच आहे .असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप नार्वेकर यांनी चिमटे काढत भाषण केले ते म्हणाले,माझ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाळा गावडे आणि त्यांची पत्नी पायाला भिंगरी लावून मतदारसंघ फिरले,मला त्यावेळी प्रश्न पडला होता.मात्र आता ते उमजले हा त्यांचा स्वार्थ होता की काय..?,असा त्यांनी प्रतिप्रश्न केला.यावेळी सभागृहात हशा पिकला त्यांच्या चिमटे वजा भाषणाला उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments