जाचक शहरविकास आराखड्या विरोधात ६ मार्चला पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा ; सुदेश आचरेकर यांची माहिती…

2

जनजागृती कृती समिती स्थापन करणार ; उद्या दैवज्ञभवन येथे नियोजन बैठक…

मालवण, ता. २ : शहरावर लादण्यात आलेल्या अन्यायकारक विकास आराखड्या विरोधात ६ मार्च रोजी येथील पालिकेवर सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे. भरड दत्त मंदिर येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून बाजारपेठ मार्गे हा मोर्चा पालिकेवर धडकणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान या मोर्चाच्या नियोजनासाठी उद्या सायंकाळी ४ वाजता दैवज्ञ भवन येथे नियोजन सभा होणार आहे यात नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नगरविकास विभागाच्या वतीने मालवण शहरावर लादलेल्या अन्यायकारक विकास आराखड्याच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र भावना असून या विषयावरून शिवसेना विरुद्ध भाजप नगरसेवकांमध्ये शाब्दिक द्वंद्व रंगले आहे. हा विकास आराखडा रद्द करण्यासाठी लवकरच नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी गेल्या महिन्यात दिला होता. आज येथे भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. आचरेकर यांनी ६ मार्च रोजी हा मोर्चा नगरपालिकेवर धडकणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भाजपाचे शहर तालुकाध्यक्ष दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, आबा हडकर, नगरसेविका ममता वराडकर आदी उपस्थित होते.
श्री. आचरेकर म्हणाले, या शहर विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी शहरात २० सदस्यीय सर्वपक्षीय जनजागृतीची कृती समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीचे गठन करण्यासाठी आणि मोर्चाचे नियोजन करण्यासाठी उद्या ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता दैवज्ञ भवन येथे शहरवासीयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या विकास आराखड्यामुळे शहरातील ९० टक्के जनता विस्थापित होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहरवासीयांचे हित डोळ्यासमोर ठेवून हे आंदोलन उभारले जात आहे. शहरवासीयांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाल्यास येथे जनता कशा पद्धतीने पेटून उठून प्रतिकार करू शकते, हे शासन आणि पालिकेला दाखवून देण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. हे आंदोलन सनदशीर आणि लोकशाही मार्गाने होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. येथील नागरिकांचा नगरपालिकेवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी पालिकेच्या गेटवर मोर्चाला सामोरे जाऊन शहरवासीयांचे निवेदन स्वीकारण्याचे आवाहनही श्री.आचरेकर यांनी केले आहे.

0

4