खारेपाटण-टाकेवाडीतील दुचाकी अपघातात युवक ठार…

2

खारेपाटण,ता.२:मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण-टाकीवाडी येथील दुचाकी अपघातात महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबतचा युवक जखमी झाला आहे. सुदर्शन सुभाष वाघरे (वय 18, रा.मधलीवाडी शेजवली-राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर वैभव विश्‍वनाथ गाडे (वय 17, रा.गाडेवाडी शेजवली) हा जखमी झाला आहे. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.

सुदर्शन आणि वैभव हे दोघे दुपारी राजापूर येथून खारेपाटणला येत होते. महामार्गावरील टाकेवाडी येथील एका वळणावर सुदर्शन वाघारे याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यात दुचाकी रस्त्यालगतच्या लोखंडी सुरक्षा कठड्याला आदळली. यात सुदर्शन वाघारे याचा मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला वैभव गाडे हा जखमी झाला. अपघातानंतर खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटणकर यांनी दुचाकीवरील दोघांनाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मयत सुदर्शन सुभाष वाघरे हा खारेपाटण महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत होता. तर जखमी वैभव हा खारेपाटण तांत्रिक महाविद्यालयात शिकत आहे. सुदर्शनच्या पश्‍चात आई, वडील व बहीण असा परिवार आहे.

0

4