२२ लाखांची दारू जप्त;डेगवे येथे राज्य उत्पादन शुल्कची कारवाई…
बांदा ता.०२: गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा सांगलीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या कॅन्टरवर राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ पथकाने डेगवे-हातीकडे येथे कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ३४ हजार चारशे रुपयाची गोवा बनावटीची दारू व सुमारे १० लाखाचे वाहन असा ऐकूण ३२ लाख ३४ हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी सुरेश तानाजी पवार (वय २३) व अजित बाळसो सावंत (वय २८ दोघेहि राहणार बनाळी ता. जत, जि. सांगली) यांना ताब्यात घेतले.
हि कारवाई बांदा दोडामार्ग मार्गावर डेगवे येथे रविवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कुडाळ येथील राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला बांद्याहुन दोडामार्गच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होणार असल्याचे गोपनीय वृत्त मिळाले होते. त्यानुसार पथकातील कर्मचारी बांदा-दोडामार्ग मार्गावरील डेगवे येथे सापळा रचून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत होते. याच दरम्यान बांद्याहुन दोडामार्गच्या दिशेने जाणारा (एमएच १० डब्लू ७९६१)आला असता येथील कर्मचार्यांनी थांबण्याचा इशारा केला. चालकाने गाडी तिथे न थांबवता पुढे नेऊन थांबविली. गाडीची तपासणी केली असता पाठीमागील होद्यात ताडपत्रीच्या खाली दारू लपवून ठेवण्यात आली होती.
यामध्ये गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे ३२० बॉक्स आढळून आले. सदरच्या दारूची किंमत २२ लाख ३४ हजार ४०० रुपये असून गाडीची किंमत १० लाख असा एकूण ३२ लाख ३४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल उत्पादन शुक्लने ताब्यात घेतला. हि कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक ए. आर. जगताप, एन. पी. रोटे. ,सी. डी. पवार, सी. एल. कदम, चालक एच. आर. वस्त, प्रसाद माळी, शिवशंकर मुपडे, यांच्यासह कुडाळ कार्यालय पथकाच्या कर्मचारी यांनी केली.