महिनाभरात ९६ हजाराचा दंड वसूल ; वाहतूक पोलिसांची धडक मोहीम…
मालवण, ता. २ : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी येथील वाहतूक पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात केलेल्या कारवाईत ९६ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात तब्बल ४३८ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
शहर व लगतच्या अन्य मार्गावर वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी चंद्रशेखर मुणगेकर व गुरुप्रसाद परब हे वाहतूक पोलिस कर्मचारी सेवा बजावत आहेत. गेल्या महिनाभरात शहरात वाहतूक नियमाचे उल्लंघन प्रकरणी श्री. मुणगेकर व श्री. परब यांनी ४३८ वाहन चालकांवर कारवाई केली. यात धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे, परवाना नसणे, परवाना असून सोबत न ठेवणे, एकदिशा मार्गाचे उल्लंघन, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, पोलिसांनी थांबवण्याची सूचना करूनही न थांबणे, रस्त्यात गाडी उभी करून जाणे, चालत्या गाडीवर मोबाईलवर बोलणे यासह अन्य नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ९६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन वाहनचालकांकडून व्हावे यासाठी श्री. मुणगेकर व श्री. परब यांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे भरधाव वेगाने वाहने हाकणारे धुमस्वार, विना परवाना दुचाकीस्वार धास्तावले आहेत. त्यांच्याकडून वाहतूक नियमाचे पालन करण्यावर अधिक भर दिला जात आहे. नागरिकांमधूनही वाहतूक पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले जात आहे.