स्थानिक व्यापारी आक्रमक;आठवडा बाजाराची जागा बदलण्यावरून वाद पेटण्याची शक्यता…
सावंतवाडी,ता.३:बाजार अचानक जिमखाना मैदानावर हलविल्यावर आज सकाळपासून धुमसत असलेले वातावरण अखेर पेटले. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी योग्य ती वागणूक दिली नाही, असा आरोप करत आज येथील स्थानिक व्यापा-यांनी अचानक बंद पुकारला. विशेष म्हणजे सर्व दुकान व बाजारात फिरून त्यांनी सर्व व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास सांगितले,त्यामुळे हा प्रश्न आता पेटण्याची शक्यता आहे.
आठवडा बाजार जिमखाना मैदानावर हलविण्यावरून आज स्थानिक व्यापाऱ्यांनी व हॉकर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याशी चर्चा केली. परंतु या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही.उलट आठवडा बाजार जिमखान्यावर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला,असा आरोप व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
या निर्णयामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आमचे म्हणने विचारात घेतले जात नाही, तोपर्यंत एकतर्फी भूमिका घेणे चुकीचे आहे. नगराध्यक्षकांचे काही नगरसेवकांनी जी वागणूक दिली, तीहि चुकीची होती. त्याच्या निषेधार्थ आज हा बंद केला असल्याचे यावेळी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.