तर…. आठवडा बाजार पुन्हा गांधी चौकात बसवा…

2

जयेंद्र परुळेकर ; बाजारावरून उठलेले वादळ शांत होणे गरजेचे…

सावंतवाडी ता.०४: शहराला शांत व सुसंस्कृत संस्कृती लाभली आहे.त्यामुळे आठवडा बाजारावरून उठलेले वादळ शांत होणे गरजेचे आहे.अनेक वर्षाची परंपरा लाभलेल्या बाजाराला पर्यायी जागा न देता,तो बाजार गांधी चौक परिसरात भरविण्यात यावा,अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्ते तथा नगरसेवक डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

सध्या सावंतवाडी शहरामध्ये आठवडा बाजाराचा मुद्दा फारच तापलेला आहे.आणि त्याला नको ते वळण लागण्याची चिन्हं दिसत आहेत.सावंतवाडी शहर हे संस्थानकालिन शहर असून त्याला एक गौरवशाली इतिहास आहे.मंगळवार आठवडा बाजार ही सावंतवाडी शहराची एक ऐतिहासिक परंपरा आहे.अनेक दशके हा आठवडा बाजार गांधी चौक परिसरात भरत आलेला आहे.तसाच तो गांधी चौक परिसरातच भरविण्यात यावा आणि त्या दिवशी म्हणजे दर मंगळवारी गांधी चौक परिसरात चार चाकी व दुचाकी वाहनांना वाहतूक बंदी करण्यात यावी.तसेही गणेशोत्सव कालावधीत सावंतवाडी बाजारपेठ परिसरात वाहतूक नियंत्रण असतेच.तशीच ती दर मंगळवारी केल्यास विनाकारण निर्माण झालेला तिढा सुटेल.असे तिढा वाढणे आणि त्याला वेगळाच रंग लागणे हे सावंतवाडीच्या शांत व सुसंस्कृत स्वभावाला शोभणारे नाही.असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

30

4