नागरिकांच्या सुविधेसाठीच रेस्ट हाऊसचे आरक्षण…

2

नगरसेवक बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांची पत्रकार परिषद…

कणकवली, ता.४: कणकवली शहरातील रेल्वे स्थानकासमोरील जागा एस.टी.महामंडळाच्या बसस्थानकासाठी आरक्षित होती. एस.टी.महामंडळाने ही जागा ताब्यात घेतली नाही. त्यामुळे नगरपंचायतीने तेथे रेस्ट हाऊससाठी जागा आरक्षित केली आहे. रात्री-अपरात्री उशिरा येणार्‍या प्रवाशांना मुक्काम करता यावा या हेतूने हे आरक्षण टाकण्यात आल्याची माहिती नगरसेवक बंडू हर्णे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड आणि गटनेते संजय कामतेकर यांनी आज दिली.
येथील नगराध्यक्ष दालनात हर्णे, गायकवाड, कामतेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी माजी नगरसेवक उमेश वाळके यांचे सुरू असलेले उपोषणाच्या अनुषंगाने नगरपंचायतीच्या आरक्षित जागेबाबतची माहिती दिली.
श्री.हर्णे म्हणाले, रेल्वे स्थानकासमोर 30 गुंठे जागा एस.टी.डेपोसाठी आरक्षित होती. एस.टी.महामंडळाने ही जागा ताब्यात घेण्यास नकार दिल्याने येथील जमीन मालकांच्यावतीने माजी नगरसेवक उमेश वाळके हे उच्च न्यायालयात गेले. तेथील निवाड्यामध्ये या जागेवरील आरक्षण उठविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार रेल्वे स्थानकासमोरील जागा आरक्षणमुक्त करण्यात आली. मात्र नगरपंचायतीला नवीन आरक्षण टाकण्याचा अधिकार आहे. त्यानुसार बसस्थानकाऐवजी शासकीय विश्रामगृह उभारण्याबाबतचा ठराव नगरपंचायतीने घेतला. त्यानुसार आता भूसंपादन आणि इतर प्रक्रिया सुरू होणार आहेत.
श्री.गायकवाड म्हणाले, माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी रेल्वे स्थानकासमोरील 30 गुंठे आरक्षित क्षेत्रापैकी केवळ 3 गुंठे जागा आहे. त्यांना ही जागा वैयक्तिक फायद्यासाठी विकसित करावयाची आहे. इतर अनेक बिल्डर यांना देखील ही जागा घशात घालायची आहे. त्यामुळे या जागेवरील आरक्षण उठवून व्यावसायिक बांधकाम परवानगीसाठी उमेश वाळके उपोषणाला बसले आहेत. या जागेवरील आरक्षण उठवले तर शहरातील सर्वच आरक्षणांची विकास प्रक्रिया धोक्यात येणार आहे. त्यामुळे येथील आरक्षण उठविण्यास आमचा विरोध आहे.
श्री.कामतेकर म्हणाले, कणकवली शहरातील विविध विकास कामांसाठी आरक्षित असलेल्या जागा अल्पदराने विकत घ्यायच्या आणि आरक्षण उठवून त्या बिल्डरला विकायच्या असा असे प्रकार माजी नगरसेवक उमेश वाळके करत आहेत. यापूर्वी त्यांनी मुडेश्‍वर मैदानातील आरक्षित जागा विकत घेऊन तेथे अवैधपणे मंगल कार्यालय सुरू केले आहे. तर कनकनगर येथील पार्किंग आरक्षणातील जागाही त्यांनी विकत घेतली आहे.

1

4