कणकवली, ता. ४: बँक ऑफ बडोदा कणकवली शाखेने सील केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्या प्रकरणी शहरातील महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. दिव्या दिनेश साळगावकर (वय 43, रा.वॉर्ड क्रं.4) असे तिचे नाव आहे. बँक ऑफ बडोदा शाखेचे अधिकारी प्रशांत शिंदे यांनी याबाबतची फिर्याद आज पोलिस ठाण्यात दिली.
फिर्यादीत नमूद केल्यानुसार दिव्या साळगावकर यांनी बँक ऑफ बडोदा कणकवली शाखेकडून कर्ज घेतले होते. या कर्ज हप्त्याची परतफेड न झाल्याने बँकेने फ्लॅट सील केला. त्यानंतर या फ्लॅटचा लिलाव पूर्ण होऊन तो अन्य ग्राहकानेही विकत घेतला. मात्र सोमवारी (ता.2) संशयित आरोपी दिव्या साळगावकर यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात बँकेच्या साहित्याचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.