कणकवलीतील उमेश वाळकेंचे उपोषण मागे …

2

आयुक्तपातळीवर लढा देणार असल्याची माहिती…

कणकवली, ता.०५: माजी नगरसेवक उमेश वाळके यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले. आपल्या जागेतील निवासी आणि वाणिज्य बांधकाम परवानगी देण्यास नगरपंचायत विलंब करत असल्याने त्यांनी 28 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते. वाळकेच्या बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने कोकण आयुक्तांकडे अपील दाखल असल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती नगरपंचायत अभियंता श्री.शिंदे यांनी केली. त्यानंतर वाळकेंनी उपोषण मागे घेतले.

कणकवली रेल्वे स्थानकासमोरील 30 गुंठे जागेत निवासी आणि वाणिज्य बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव श्री.वाळके यांनी नगरपंचायतीकडे सादर केला होता. मात्र या जागेवर नगरपंचायतीने विश्रामगृह बांधण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे बांधकामाला परवानगी दिली जावू शकत नसल्याचे पत्र नगरपंचायतीने वाळके यांना दिले होते. नगरपंचायतीच्या या ठरावाविरोधात वाळके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपील केले होते. या सुनावणीत जिल्हाधिकार्‍यांनी नगरपंचायतीचा ठराव तहकूब केला. तर तहकूब निर्णयाविरोधात उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड यांनी कोकण आयुक्तांकडे अपील केले होते. या अपीलाची प्रत आपणास मिळावी अशी मागणी उमेश वाळके यांनी नगरपंचायतीकडे केली होती. मात्र या अपीलाची प्रतही दिली जात नाही आणि बांधकाम परवानगीही देण्यास विलंब केला जात असल्याने श्री.वाळके यांनी प्रांत कार्यालयासमोर 28 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले होते.
कोकण आयुक्त कार्यालयात उपनगराध्यक्ष श्री.गायकवाड यांचे अपील दाखल असल्याचे पत्र काल (ता.4) नगरपंचायतीला प्राप्त झाले. ते पत्र आज नगरपंचायत प्रशासनाने आज वाळके यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. तसेच नगरपंचायतीच्या कारभारा विरोधात आयुक्त पातळीवर लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

2

4