ऊस तोड कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या…

2

तिथवली येथील घटना; मृत तरुण परभणीचा

वैभववाडी.ता,०५:  ऊस तोड कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी दुपारी तिथवली इस्वलकरवाडी येथे उघडकीस आली. रोहीदास सखाराम पवार वय ३७ वर्षे रा. गारखेड, जोगवाडा ता. जिंतूर जि. परभणी असे मयत कामगाराचे नाव आहे.
परभणी येथील ऊस तोडणी कामगार तालुक्यात गेले दोन महिने विविध ठिकाणी ऊसतोडणी करीत आहेत. यापैकी एक टोळी सध्या तिथवली इस्वलकरवाडी येथे ऊस तोड करीत आहे. यातील रोहीदास पवार हा दि. ४ मार्च रोजी दुपारी १२ वा. सुमारास शौचालयास जातो असे आपल्या सोबतीच्या कामगारांना सांगून गेला. तो सायंकाळी उशीरापर्यंत पर्यंत परत आला नाही. त्याचे भाऊ व अन्य नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र तो सापडला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा शोधाशोध केली असता, तिथवली इस्वलकरवाडीजवळ एका आईनाच्या झाडाला नायलाॕन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.त्याच्या पश्चात पत्नी व मुले आहेत. त्याच्या भावाचे कुटुंबही तेथेच कामाला आहे.
या घटनेची खबर समजतात वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस श्री. पडेलकर, श्री. मारुती साखरे, श्री. योगेश राऊळ यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृतदेहावर परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पडेलकर करीत आहेत.

3

4