जिल्हा भाजपाच्यावतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान‘ राबविणार…

2

वेंगुर्ला,ता.०६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ साली महत्वकांक्षी असे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान‘ सुरु केले. महिलांच्या जन्मदरात झालेली वाढ, मुलींच्या शिक्षणाचा वाढता टक्का, पोषणाविषयीच्या योजना आदींमुळे सशक्त समाज म्हणून आता देशाची वाटचाल सुरु आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनीही या अभियानाचा विशेष उल्लेख केला आहे. हे अभियान म्हणजे जगन्नाथाचा रथ आहे आणि संपूर्ण देश त्याच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहे. म्हणूनच महिला दिनाचे औचित्य साधून सिधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीतर्फे हे अभियान राबविणार असल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या अभियानात ग्रामीण भागातील ज्या भटक्या जमातीतील मुलींना शिक्षणात प्रवाहात आणून त्यांना केंद्र सरकारची सुकन्या समृद्धी योजना, फडणवीस सरकारची माझी कन्या भाग्यश्री या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच मुलींचे शिक्षण, उच्च शिक्षण, त्यांच्या लग्नाचा खर्च आदींसाठी सरकार करीत असलेला खर्च या समाजातील मुलींना मिळवून देण्यासाठी भाजपामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. मुलींसाठी सरकारने केलेल्या योजना पालकांपर्यंत पोहचण्यासाठी गुणवान मुलींचा सन्मान, कन्यापूजन, केवळ मुलीच असणा-या दांपत्यांचा सन्मान करणे असे कार्यक्रम राबविले जाणार आहेत. डॉक्टरांनी लिगनिदान चाचणी करु नये यासाठी डॉक्टरांच्या संपर्कात राहणार आहेत.
अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण महिलांना स्थान देण्यात आले आहे. याचा फायदा देण्यासाठी महिला बचतगटांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. बचतगटांमार्फत ग्रामीण भागामध्ये गोदामे आणि शितगृहांच्या उभारणीस प्रोत्साहन दिले जाणार आहे. धनलक्ष्मी योजनेंतर्गत महिलांकडील पारंपरिक ज्ञान व वैज्ञानीक ज्ञान यांची सांगड घालण्याचे काम केले जाणार आहे.
अशा अभियानाच्या विविध योजना सिधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली महिला दिनाचे औचित्य साधून या राष्ट्रीय चळवळीत भारतीय जनता पार्टी सहभागी होणार असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.

5

4