तहसीलदार अजय पाटणे यांची कारवाई ; १ लाख १४ हजाराचा दंड वसूल…
मालवण, ता. ६ : धामापूर काळसे रस्त्यावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणार्या डंपरवर तहसीलदार अजय पाटणे यांनी काल रात्री कारवाई केली. यात डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडली. डंपर जप्त करून तहसील कार्यालयात आणण्यात आला. आज सायंकाळी १ लाख १४ हजार ७८८ रुपयांचा दंड भरल्यानंतर डंपर सोडून देण्यात आला. संबंधिताकडून बंधपत्र घेण्यात येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली.
तालुक्यात सध्या रात्रीच्यावेळी अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने धडक कारवाई मोहिम हाती घेतली आहे. यात काल रात्री साडे आठ वाजता धामापूर काळसे रस्त्यावर अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारा डंपर तहसीलदार अजय पाटणे, दिनेश सावंत, अमोल कदम, अरूण व्हनमाने, विष्णू तोंडारे, गणेश कुबल यांच्या पथकाने पकडला. डंपर क्रमांक एम. एच. ०७ सी-६६७९ हा गजानन वसंत सावंत रा. कुडाळ यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. डंपरमध्ये दोन ब्रास वाळू सापडली. त्यामुळे हा डंपर तहसील कार्यालयात आणण्यात आला. संबंधितास महसूल प्रशासनाने नोटीस बजावल्यानंतर सायंकाळी १ लाख १४ हजार ७८८ रुपयांचा दंड भरल्यानंतर डंपर सोडून देण्यात आला. संबंधिताकडून बंधपत्र घेण्यात येणार असल्याचे महसूलच्या अधिकार्यांनी सांगितले.