बांद्यात होणार सुसज्ज मच्छी मार्केट…

2

अक्रम खान यांची माहिती;नव्या इमारतीसाठी २५ लाखांची तरतूद…

बांदा,ता.०७: शहरात आळवाडी येथे २५ लाख रुपये खर्चून सुसज्ज मच्छीमार्केट होणार असून या कामाची सुरुवात २ दिवसात करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी आज सरपंच अक्रम खान व ग्रामपंचायत सदस्य यांनी करत ठेकेदाराला आवश्यक सूचना दिल्यात.
आळवाडी येथील जुनी मच्छीमार्केट इमारत निर्लेखीत करून त्याजागी सुसज्ज व अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीत मच्छी विक्रेत्यांना बसण्यासाठी रॅक ठेवण्यात येणार आहेत. तसेच सांडपाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था, इमारतीच्या लगत विंधन विहीर, हायमास्ट आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत.
सदरचा भाग हा पुरबाधित असल्याने याठिकाणी इमारतीची उंची वाढविण्यात येणार आहे. इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. तोपर्यंत मच्छीमार्केट नजीक बांधण्यात आलेल्या गोदामात मच्छी विक्रेत्यांची सोय करण्यात येणार असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले. यावेळी सरपंच खान व ग्रामपंचायत सदस्यांनी ठेकेदाराला दर्जेदार काम करण्यासंदर्भात आवश्यक सूचना दिल्यात.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसरपंच हर्षद कामत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, साईप्रसाद काणेकर, किशोरी बांदेकर, स्वप्नाली पवार, अंकिता देसाई, उमांगी मयेकर, समीक्षा सावंत, राजेश विरनोडकर आदी उपस्थित होते.
आळवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी उद्यानाची यावेळी पाहणी करण्यात आली. येथील उद्यानात कमी दर्जाची खेळणी उपलब्ध करून देणाऱ्या कोल्हापूर येथील ठेकेदाराला बोलावून चांगल्या दर्जाची खेळणी बसविण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. लवकरच उद्यानाचा कायापालट करण्यात येणार असून याठिकाणी लहान मुलांसाठी ऍडव्हेंचर पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याचे सरपंच खान यांनी सांगितले.

10

4