नसबंदी प्रकरणात आरोग्य सेवकाच्या विरोधात उद्या नातेवाईकांचे उपोषण…

2

बांदा.ता,१०: पाडलोस-केणीवाडा येथील प्रशांत नाईक बळजबरी नसबंदी प्रकरणी अद्यापपर्यंत कारवाई न झाल्याने संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी संपूर्ण नाईक कुटुंबिय उद्या बुधवार दिनांक ११ रोजी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपोषणास बसणार आहेत. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे आमच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याची कैफियत पत्नी प्रतिक्षा नाईक यांनी बांदा पोलीसांसमोर मांडली.
पाडलोस-केणीवाडा येथील प्रशांत नाईक यांच्यावर आरोग्य कर्मचार्‍यांकडून बळजबरीने नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याप्रकरणातील संशयितांवर कारवाई होण्यासाठी पत्नी प्रतिक्षा नाईक यांनी बांदा पोलीसांत तक्रार अर्ज दिला आहे.
या प्रकरणात दोषी असलेल्यांना तातडीने ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी निरीक्षक ए. डी. जाधव यांची आठ दिवसांपूर्वी भेट देखील घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नसल्याने नाईक कुटुंबीयांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस निरीक्षक जाधव यांनी प्रकरणाचा तपास सुरु असून संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. कारवाई न झाल्याने न्यायासाठी उपोषणास बसणार असल्याचे प्रतीक्षा नाईक व भाऊ विश्वनाथ नाईक यांनी सांगितले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, बांदा पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.

1

4