ऑलिव्ह रिडले कासवाच्या ९५ पिल्लांना सुरक्षितरित्या जीवदान…

2

शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावरील दोन महिन्यातील तिसरी घटना…

वेंगुर्ला, ता.१०:
शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर गेली अनेक वर्षे स्वछता मोहीम राबवून स्वछतेचा संदेश देणारे ग्रा.प.सदस्य आजू आमरे आणि कासव मित्र आबा चिपकर यांनी ऑलिव्ह रिडले कासव जातीच्या सुमारे ९५ पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान दिले.
ऑलिव्ह रिडले हे समुद्री कासव किनाऱ्यावर येऊन खड्डा खणून अंडी घालून जाते. या खड्यातून जवळपास ४० ते ४५ दिवसा नंतर पिल्ले बाहेर येतात. सुरक्षित वाटणाऱ्या किनाऱ्यावरच ही कासवे अंडी घालतात. वेंगुर्ले तालुक्यात शिरोडा, मोचेमाड आणि वायंगणी या किनाऱ्यावर ही अंडी आढळतात. मात्र कासवाने अंडी दिल्या नंतर त्या खड्यातील अंड्यांचे मोठ्या पक्षांपासून, कुत्र्यांपासून रक्षण होणे महत्त्वाचे असते. शिरोडा किनाऱ्यावर आजू आमरे व आबा चिपकर हे कासव मित्र कासवाच्या या अंड्यांची काळजी घेतात. त्या खड्या भोवती कुंपण घालतात, आणि त्या अंड्यांची नीट काळजी घेतात. विषेश म्हणजे अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर वनविभागाच्या सल्याने त्यांना सुखरूप पणे समुद्रात सोडतात.
शिरोडा किनाऱ्यावर काल एका खड्यात असलेल्या एकूण १२४ अंड्यांपैकी बाहेर आलेल्या ९५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. यापूर्वी गेल्या महिन्यात एकदा ३५ व दुसऱ्यांदा ५४ पिल्ले समुद्रात सोडली होती. आज तिसऱ्यांदा कासव मित्र आजू आमरे, आबा चिपकर यांनी ही पिल्ले सोडली. यावेळी बस्त्याव आल्फान्झो, ग्रा.प.सदस्य निलेश मयेकर, आनंद अमरे, समिर भगत, प्रकाश भगत,गौरवी अमरे, मदन अमरे, मालिनी आमरे, प्रीती भगत, अश्रफ शेख, अशोक भगत, सुरज भगत, वेदांत नाईक, पत्रकार दाजी नाईक, मुंबई येथील पर्यटक प्रणय सावंत, अतिष राणे तसेच विदेशी पर्यटक आदी उपस्थित होते. त्यांनीही या चिमुकल्या पाहुण्यांच्या नवजीवन प्रवासाचा किनाऱ्यावर आनंद घेतला.

8

4