ग्रामस्थांच्या जागरूकीमुळे ओटवणेत वीजचोरी उघड

2

केरळीयन लोकांकडून प्रताप;विजेचा शाॅक लागल्याने कापईवाडीतील युवक जखमी

सावंतवाडी.ता,११: ओटवणे येथे विजेची चोरी करणाऱ्या केरळीयनाचा प्रयत्न तेथील जागरूक ग्रामस्थांनी हाणून पाडला तसेच त्‍यांना अधिकार्‍यांसमोर रंगेहाथ पकडले.ही घटना काल रात्री ओटवणे कापईवाडी येथे घडली. तत्पूर्वी तेथील एका युवकाला विजेचा धक्का लागल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले.त्यांनी केलेल्या पाहणीत ही वीज चोरी उघड झाली.दरम्यान संबंधित केरळीयनावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच अन्य विज चोरी करणा-यांचा शोध घ्यावा, विजेची समस्या गावात निर्माण झाली आहे. त्यामुळे नेमका बिघाड शोधावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ओटवणे गावात गेले अनेक दिवस वायरमन नाही. काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाले आहेत.त्यामुळे घरातील अर्थिंगला शॉक लागण्याचा प्रकार वाढत आहे.काल तेथील युवक आनंद कातकर या तरुणाला सायंकाळी शॉक लागला त्यामुळे या प्रकाराला विजेची अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप करत तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी अधिकाऱ्यांनी यावे अशी मागणी लावून धरली. त्यानुसार वीज कंपनीचे अधिकारी त्या ठिकाणी गेले मात्र बिघाडाची पाहणी करत असताना नदीच्या काठी लावण्यात आलेल्या पंपा साठी काही केरळीयन लोकांकडून वीजचोरी केली जात असल्याचा प्रकार आढळून आला.त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले बिनदिक्कतपणे हे लोक अशाप्रकारे चोरी करत आहेत. त्यामुळे याला अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला.तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली.चोरी केल्याप्रकरणी त्याठिकाणी असलेल्या संशयिताला ताब्यात घेण्याची मागणी केली.मात्र याबाबत उद्या आपण योग्य ती कारवाई करू असे सांगून अधिकारी निघून गेले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र म्हापसेकर, संतोष तावडे, मंगेश गावकर,प्रकाश पन्नासे, प्रमोद केळूसकर, राजन तारी, प्रमोद पानसे आदी उपस्थित होते.

4

4