बेकायदेशीर दुचाकी प्रवासी वाहतुकीवर कारवाई करा…

2

रिक्षा व्यावसायिकांची आरटीओ अधिकाऱ्यांकडे मागणी ; पोलिस अधीक्षकांनाही निवेदन सादर…

मालवण, ता. ११ : रिक्षा व्यवसाय करत असताना आम्ही नियमांचे पालन करतो. व्यवसायातून मिळणार्‍या अल्प उत्पन्नातून आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मात्र शहरासह पंचक्रोशीत पर्यटकांना दुचाकी बेकायदेशीररीत्या भाडे तत्त्वावर देण्याचे प्रकार वाढले आहेत. दुचाकी मालकांकडे कोणताही कायदेशीर परवाना नसताना प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिक्षा संघटनांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांकडे करण्यात आली.
मालवणातील रिक्षा व्यावसायिक चालक-मालक संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे संबंधित दुचाकी मालकांवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज सादर करण्यात आले. यावेळी सुधीर कद्रेकर, उमेश मांजरेकर, हेमंत कांदळकर, प्रदीप मांजरेकर, प्रसाद वराडकर, सदू मातोंडकर, विठू वराडकर, बाबू पालव, राजा मांजरेकर, जगदीश सातार्डेकर यांच्यासह अन्य रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते. रिक्षा व्यावसायिकांनी एक दिवस व्यवसाय बंद ठेवल्याने त्याचा फटका प्रवासी वर्गाला बसला.
शहर व पंचक्रोशीत दुचाकी पर्यटकांना बेकायदेशीरपणे भाडेतत्त्वावर देण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे परवानाधारक रिक्षा व्यवसाय संकटात आला आहे. रिक्षा व्यावसायिकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीतीही व्यावसायिकांनी अधिकार्‍यांसमोर व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शहर व पंचक्रोशी हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र आहेत. याठिकाणी आम्हाला पर्यटक प्रवासी उपलब्ध होतात. परंतु अलीकडे अत्यंत बेकायदेशीरपणे पर्यटकांना दुचाकी भाड्याने देण्याचे प्रकार वाढल्याचे रिक्षा व्यावसायिकांनी पोलिस अधीक्षक, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले.
जाहीर फलक लावून गाड्या दुचाकी भाड्याने दिल्या जात आहेत. वैयक्तिक मालकीच्या दुचाकी पर्यटकांना भाडे तत्त्वावर देण्याचा कोणताही कायदेशीर परवाना यांच्याकडे नाही. दुचाकी भाडे तत्त्वावर घेणार्‍या पर्यटकांना येथील कोणतीही माहिती नसल्याने वाहतूक नियम मोडणे, अपघात अशा घटना घडतात. एखाद्या अवघड वळण अथवा उतारावर जीवघेण्या अपघाताची शक्यताही नाकारत येत नाही. या सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून शहर व पंचक्रोशी येथून सुरू असलेली बेकायदेशीर पर्यटक प्रवासी वाहतूक व पर्यटकांना भाडे तत्त्वावर देण्यात येणार्‍या दुचाकी यावर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

2

4