आंबोलीतील घटना;अपघातग्रस्त दाम्पत्य कुठचे, माहिती मिळण्यास अडचणी…
आंबोली ता.१८: घाटात पेटत्या कारमध्ये अडकलेल्या महिलेचा अखेर जळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.दरम्यान तिला वाचविण्यासाठी पोलिस प्रशासनासह तेथील ग्रामस्थ व प्रवाशांनी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले.तर कार चालकाने उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला,मात्र त्याच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यामुळे त्यालासुद्धा गंभीर दुखापत झाली आहे.ही घटना आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान बचावलेल्या तरुणाच्या बोलण्या नुसार मृत व्यक्ती त्याची पत्नी असावी,असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.जखमीला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. मात्र ती कार कोठून आली ?,कोठे जात होती व संबंधित गंभीर जखमीसह मृत व्यक्ती कोण आहे ?, हे कळू शकले नाही.याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांच्या म्हणण्यानुसार संबंधित कार अपघात करून पळण्याच्या प्रयत्नात होती.दरम्यान ती अपघातग्रस्त असून सुद्धा चालकाने वेगात हाकल्याने तिने अचानक पेट घेतला असावा,असा अंदाज आहे.दरम्यान घटनेनंतर कार चालक जखमी तरुणाने स्वतःचा बचाव करण्यासाठी कार मधून बाहेर उडी घेतली.मात्र चालती कार पंचवीस फूट खोल दरीत कोसळल्यामुळे आतील महिलेला वाचवण्याचे प्रयत्न अखेर व्यर्थ ठरले.ती पूर्णता जळाल्याने फक्त हाडांचा सांगाडा गाडीत उरला आहे. तर अपघातानंतर बचावलेल्या व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यास पोलिसांना अपयश येत आहे दरम्यान तो आपली बायको कुठे आहे आपल्या बायकोला वाचवा अशी आर्त साद देत असल्यामुळे मृत व्यक्ती त्याची पत्नी असावी,असा अंदाज आहे.