टॉलर्स धारकांना ५ कोटी ४८ लाख डिझेल परताव्याचा निधी उपलब्ध…

2

चोपडेकर- खांदारे यांची माहिती ; आम. वैभव नाईकांचे मानले आभार…

मालवण, ता. १९ : जिल्ह्यातील ट्रॉलर्सधारकांना फेब्रुवारी अखेरपर्यंत ९ कोटीपैकी ५ कोटी ४८ लाख रुपयांचा डिझेलचा परतावा आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिला आहे. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी उपलब्ध झाला असून मत्स्य आयुक्तांचे पत्र मालवण मत्स्यव्यवसाय विभागास प्राप्त झाले आहे. सध्या समस्यांच्या गर्तेत असलेल्या मच्छीमारांना या डिझेल परताव्यामुळे ऊर्जा मिळाली आहे अशी माहिती मालवण मच्छीमार सहकारी सोसायटीचे विकी चोपडेकर, संतोष खांदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण मच्छीमार सहकारी सोसायटी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वासुदेव आजगावकर, भगवान मुंबरकर, अबू आडकर, कांता सावजी, प्रमोद खवणेकर, तपस्वी मयेकर, जयवंत मालवणकर, मोहन शिरसाट, रमेश मेस्त, मनीष खडपकर, झेवियर रॉड्रिक्स, सुरेश पटनाईक, बाबू शिरगावकर, सुधीर जोशी यांच्यासह विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मे २०१७ पासूनचा प्रलंबित असलेला डिझेल परतावा मिळावा यासाठी मच्छीमार सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधले होते. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यात डिझेल परताव्याचे ५६ लाख रुपये तर आता ४ कोटी ९२ लाख रुपये डिझेल परताव्याची रक्कम उपलब्ध झाली आहे. याबाबत मत्स्य आयुक्तांचे पत्र येथील मत्स्यव्यवसाय विभागास प्राप्त झाले आहे. सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त श्रीकांत वारूंजीकर रजेवर असल्याने प्रभारी अधिकारी श्री. भादुले यांच्याकडे पदभार सोपविला असून डिझेल परताव्याची रक्कम येत्या दोन चार दिवसात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल. एकूण ९ कोटी रुपयांच्या डिझेल परताव्यापोटी सुमारे ५ कोटी ४८ लाख रुपयांच्या परताव्याची रक्कम उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही आमदार वैभव नाईक यांचे आभारी असल्याचे ट्रॉलर्सधारकांनी स्पष्ट केले.
क्यार चक्रीवादळाच्या समस्येनंतर सावरत असतानाच आता कोरोनाच्या नव्या संकटामुळे मच्छीमार हवालदिल बनला आहे. पर्यटकांची संख्या रोडावल्याने तसेच मिळणार्‍या मासळीच्या दरातही घट झाल्याने त्याचा मोठा आर्थिक फटका मच्छीमारांना बसला आहे. मासळीचा लिलाव करणारे, खरेदी व विक्री करणारी माणसे ही स्थानिकच आहेत. मात्र शासनाच्या निर्देशानुसार गर्दी होणार नसल्याची दक्षता घेण्याचे आवाहन केल्याने त्याचाही परिणाम होणार आहे. शिवाय कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मासळीची निर्यातही बंद होण्याची शक्यता आहे. मच्छीमार संकटात सापडला असताना डिझेल परताव्याची रक्कम उपलब्ध झाल्याने ट्रॉलर्सधारकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मच्छीमार व सोसायट्या जिवंत ठेवण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागानेही आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन ट्रॉलर्सधारकांसह, सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी घेतला. मात्र त्याप्रमाणात मच्छीमारांना या योजनेतील जाचक अटींमुळे याचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे शासनाने या योजनेतील अटी मच्छीमारांसाठी शिथिल केल्यास तळागाळातील मच्छीमार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे स्पष्ट करण्यात आले. क्यार चक्रीवादळात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळाली मात्र नुकसानीचा केंद्रबिंदू मच्छीमार असताना त्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

5

4