आंबोली कार जळीत प्रकरण;नातेवाइकांनी दिली पोलिसांना माहिती…
आंबोली ता.१९: घाटात चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने घडलेल्या दुर्घटनेत जळून मृत्यू झालेली ती महिला कार चालकाची पत्नी नसल्याचे समोर आले आहे.दरम्यान तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कार चालक हा मृत महिलेचा फॅमिली डॉक्टर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ही घटना काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली होती.यात रिजवाना असलम पथरवट( ४५),रा.बेळगाव,ही महिला जळून खाक झाली होती,तर चालक दूंडप्पा बंगारप्पा पद्मानवर (रा.बेळगाव) याने गाडीतून उडी घेतल्याने तो बचावला होता.मात्र त्याच्याही अंगावरील कपड्यांनी पेट घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.दरम्यान घटनेची माहिती मिळताच आज मृत महिलेच्या नातेवाईकांनी आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना सविस्तर माहिती दिली.याबाबत मृत महिलेचा जावई मैनुद्दिन मोहम्मद शेख रा.आजरा,याने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंभीर जखमी चालकाला काल रात्री उशिरा गोवा बांबुळी रुग्णालय दाखल करण्यात आले होते.तर आज सकाळी संबंधित मृत महिलेच्या जावयासह मुलगा व इतर नातेवाईक आंबोलीत दाखल झाले.सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिकारी श्वेता शिरोडकर यांनी मृत महिलेचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.मात्र संबंधित कारचालक गोवा-बांबोळी येथे उपचार घेत असून त्याचे कोणतेही नातेवाईक उपस्थित झाले नाही.त्याचे मित्र सावंतवाडी व त्यानंतर गोव्यात दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.दरम्यान हॉटेलवर त्याने दिलेल्या ओळखपत्राच्या पत्त्यावर तो राहत नसल्याचे ही तपासात निष्पन्न झाले आहे.त्यामुळे त्याची नेमकी ओळख पटली नसून त्याच्याकडे असलेली व जळालेली कार नेमकी कोणाची होती याबाबतही पोलीसंचा अधिक तपास सुरू आहे.सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबु तेली, राजेश गवस, गुरुदास तेली, गजानन देसाई या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.