जनता कर्फ्युला सिंधुदुर्गात उत्स्फुर्त प्रतिसाद…

2

सिंधुदुर्गनगरी,ता.२२  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूच्या आवाहानास प्रतिसाद देत सिंधुदुर्गातील जनतेने आज दिनांक 22 मार्च 2020 रोजी उत्स्फुर्तपणे कर्फ्यू पाळला. जनतेने दिलेल्या या प्रतिसादाबद्दल जिल्हा प्रशानाने जनतेचे आभार मानले आहेत.
सावंतवाडी येथे नेहमी गजबलेला असणारा मोती तलाव रस्ता आज संपूर्णतः रिकामा दिसत होता. तसेच नगर पालिका, बाजार परिसरातही शुकशुकाट होता. कुडाळ ही जिल्ह्यातील सर्वात महत्वाची आणि गजबजलेली बाजार पेठ म्हणून ओळखली जाते. पण, आज जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कुडाळ बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. संपूर्ण बाजारपेठेमध्ये शुकशुकाट होता. मालवण ही पर्यटकांची पंढरी. या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी कमी झाली होती. जनता कर्फ्यूमळे नेहमी पर्यटक आणि स्थानिक व्यापारी व नागरिक यांच्या गर्दीने फुलणारी मालवणची बाजारपेठ ही बंद होती. बस स्थानकावरही शुकशुकाट पहावयास मिळाला. अनेक गाड्या बस स्थानकामध्येच थांबून असल्याचे पहावयास मिळाले. कणकवली येथेही आचरा रोड चौक, मुख्य बाजारपेठ येथे रिकामे रस्ते नजरेस पडत होते. बस स्थानकावरील गर्दी आज कुठेच दिसत नव्हती. वेंगुर्ले शहरातही अशीच परिस्थिती पहावयास मिळाली. सर्वच शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा रिकाम्या दिसत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या आवाहनाला जनतेने दिलेल्या या प्रतिसादाचा फायदा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी निश्चित होणार आहे. आज 14 तासांकरिता नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्पर्शाद्वारे विषाणूंचा प्रसार होणार नाही. 14 तास इतका वेळ विषाणू पृष्ठभागावर जिवंत राहणार नाही. त्यामुळे निश्चितच कोरोना विषाणूचा प्रसार रोखता येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. तरीही लोकांनी पुढील सूचना येईपर्यंत घराबाहेर पडू नये. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
कोरोना विरुद्धच्या या लढ्यामध्ये सिंधुदुर्गातील जनतेने दिलेले हे सहकार्य असेच कायम ठेवावे, सार्वजनिक आरोग्य विषयक सूचना पाळाव्यात तसेच जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे व एकजुटीने आलेल्या या संकटाचा समाना करावा असे आवाहनही जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
• सोबत फोटो जोडले आहेत.

1

4