जमावबंदी असतानाही मालवणच्या बाजारात मोठी गर्दी ; विक्रेत्यांकडून भाज्यांच्या दरात वाढ…

2

नगराध्यक्षांकडून गर्दी टाळण्याच्या सूचना ; अन्यथा उद्यापासून कडक कारवाईचा इशारा…

मालवण, ता. २३ : राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरी भागात गर्दी टाळण्यासाठी १४४ कलम लागू केले असताना अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील बाजारपेठेत भाजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. काही व्यावसायिकांकडून जादा दराने भाजीची विक्री सुरू होती. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी नगराध्यक्षांचे लक्ष वेधले.
दरम्यान नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती यतीन खोत, नगरसेवक मंदार केणी व स्वच्छता विभागाचे रमेश कोकरे यांनी बाजारपेठेत जात व्यावसायिकांना तसेच खरेदीस आलेल्या नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी काही अंतर ठेवून भाजीची मांडणी करावी. दुकानासमोर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा उद्यापासून कडक कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. नागरिक व व्यापाऱ्यांनाही नगराध्यक्षांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी टाळल्याचे दिसून आले.
१४४ कलमाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. यात दूध, फळे, पालेभाज्या, किराणा, आरोग्य व्यवस्था, मेडिकल, वृत्तपत्र, तसेच सरकारी कार्यालये, बँका, वित्तीय संस्था यातील व्यवहार सुरू आहेत. मात्र, गरज असल्यासच नागरिकांनी बाहेर पडावे, कोणत्याही परिस्थितीत गर्दी करू नये असे आदेश काल सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. त्याची कार्यवाहीही सुरू झाली. मात्र, आज अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शहरातील बाजारपेठेत आठवडा बाजाराप्रमाणे गर्दी झाल्याचे दिसून आले. व्यावसायिकांनी जवळ जवळ दुकानांची मांडणी केल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.
काही भाजी विक्रेत्यांनी तर भाज्यांच्या दरात अचानक वाढ केल्याने त्याचा फटका अनेक ग्राहकांना बसला. याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगराध्यक्षांचे लक्ष वेधले. याची तत्काळ दखल घेत नगराध्यक्ष व बांधकाम सभापती यांनी बाजारपेठेत जात व्यावसायिकांना दुकाने अंतर ठेवून मांडण्याच्या सूचना केल्या. भाजी विक्रेत्यांना दरपत्रक, तसेच दुकानासमोर नागरिकांची गर्दी होता नये याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांनाही गर्दी करू नये असेही आवाहन केले. पालिकेच्या स्वच्छता व आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी यावेळी दिले.

2

4