संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा…

2

कडक अंमलबजावणीस तहसीलदार, पोलिस निरीक्षक उतरले मैदानात ; शहरातील अन्य भागातही पोलिसांकडून कडक कारवाई…

मालवण, ता. २४ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीच्या कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी खुद्द तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी स्वतः मैदानात उतरले आहे. संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणार्‍या अनेकांना उठाबशा काढण्यास लावण्यात आले.
संचारबंदीच्या काळात शहरात सकाळी आठ ते अकरा यावेळेतच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी घराबाहेर पडावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अकरा वाजल्यानंतर रस्त्यावर फिरणार्‍यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे. शहरातील फोवकांडा पिंपळ येथे तहसीलदार अजय पाटणे आणि पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरवात केली. यात फोवकांडा पिंपळ परिसरात विनाकारण फिरणार्‍या काही तरुणांना त्यांनी उठाबशा काढण्यास लावले. शहरातील भरडनाका, बाजारपेठ, बंदरजेटी सह विविध ठिकाणी पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे.
संचारबंदी काळात सकाळी आठ ते अकरा यावेळेतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात यावीत अशा सक्त सूचना देऊनही काही अन्य व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडल्याचे दिसून आले. हे निदर्शनास येताच स्थानिक पोलिसांनी त्या त्या ठिकाणी जात ही सर्व दुकाने बंद करण्यास भाग पाडले. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला.

3

4